सांगली: उत्सवी मिरवणुकामध्ये ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील असले तरी तांत्रिक अहवाल प्राप्त होईपर्यंत गुन्हे दाखल करण्यावर मर्यादा येत असल्याची अप्रत्यक्ष कबुली पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पत्रकार बैठकीत दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुरूवारी मिरज व सांगली येथील गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी केल्यानंतर श्री. फुलारी यांनी माध्यमांशी संवाद साधला. सार्वजनिक गणेश मंडळाच्या स्वागत मिरवणुकीमध्ये ध्वनी वर्धकांचा वापर करीत ध्वनी मर्यादेचे उल्लंघन झाले आहे का असे विचारले असता ते म्हणाले, ध्वनींची तीव्रता मोजणी करून त्याची माहिती तज्ञांकडे देण्यात येते. तज्ञांचा अहवाल आल्यानंतर संबंधितांना नोटीसा बजावण्यात येतात.

हेही वाचा… या गावात आहेत २१ पुरातन गणेशमूर्ती

गणेश स्वागत मिरवणुकीमध्ये एका मंडळाने ध्वनी मर्यादचे उल्लंघन केल्याचे आढळून आले असून त्या मंडळाला नोटीस देण्यात आली आहे. तर नागपंचमी वेळी शिराळा येथे सहा मंडळाना ध्वनी मर्यादेचा भंग केल्याप्रकरणी नोटीसा बजावण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. मंडळाकडून नोटीसीला उत्तर आल्यानंतर पुढील कार्यवाही पोलीसाकडून केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, विसर्जन मिरवणुका शांततेने पार पडाव्यात यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असून आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले आहे. मिरवणुक मार्गावर ड्रोन कॅमेर्‍याद्बारे नजर ठेवण्यात येणार असून उपद्रवक्षम लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई पोलीसांनी केली आहे.

हेही वाचा… रायगड : तडीपारीच्या प्रस्तावांवर तीन वर्षानंतरही निर्णय नाही; गुंड मोकाट…

रिलायन्स ज्वेल्सवर भरदिवसा पडलेल्या दरोडा प्रकरणी नउ जणांची नावे निष्पन्न करण्यात पोलीसांना यश आले असून त्यांचे पत्ते व छायाचित्रेही पोलीसांना प्राप्त झाली आहेत. आंतरराज्य टोळी यामध्ये सहभागी असल्याने अन्य राज्याच्या पोलीसांच्या मदतीने या दरोड्याची उकल करण्याचा प्रयत्न आहे. या टोळीतील एका संशयितांला पोलीसांनी अटक केली असून अन्य फरार संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक कार्यरत असल्याचेही त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In cases of noise pollution violations criminal proceedings are restricted till the technical report is received dvr