कराड : अधिकारी संविधान आणि शासनाचे प्रतिनिधी आहेत. पण, ते भाजप आमदार डॉ. अतुल भोसले यांचे दलाल (एजंट) म्हणून काम करत आहेत, हे वर्तन सहन केले जाणार नाही. वेळप्रसंगी कार्यालयात येऊन अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासू, असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिला.
कराड तहसील कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी सन २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील बोगस मतदानप्रकरणी मागील दोन दिवसांपासून सुरू केलेल्या धरणे आंदोलनाला रणजितसिंह देशमुख यांनी उपोषणस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांना काँग्रेस पक्षाचा पाठिंबा जाहीर केला.
याप्रसंगी कापील गावात बोगस मतदान झाल्याचे निदर्शनास आणून, यास अधिकारी आणि अव्वल कारकून जबाबदार असल्याचा आरोप आंदोलनकर्ते गणेश पवार यांनी केला. या आरोपाच्या पार्श्वभूमीवर देशमुख बोलत होते. यावेळी काँग्रेसचे कराड दक्षिण तालुकाध्यक्ष नामदेव पाटील, अजित पाटील, प्रदीप जाधव आदींची उपस्थिती होती.
रणजितसिंह देशमुख म्हणाले, विधानसभेच्या कराड दक्षिण मतदारसंघात बाहेरील जिल्ह्यातील लोकांची मतदार नोंदणी करून मोठ्या प्रमाणात मत चोरी करण्यात आली. हे सरकारच मत चोर आणि गद्दार आहे. राहुल गांधींनी अशा अन्यायाविरोधात देशव्यापी आंदोलन उभे केले असून, गणेश पवार यांचे हे आंदोलन त्याच लढ्याचा एक भाग असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
अजित पाटील यांनीही आमदार डॉ. अतुल भोसले व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर सडकून टीका केली. शेतकऱ्यांपासून ते मतदारांपर्यंत सगळ्यांची फसवणूक करणाऱ्या या सरकारविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरली असून, हे आंदोलन न्यायाचा लढा असल्याचे पाटील यांनी सांगितले.