अलिबाग : रायगड जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या दक्षिण रायगडमधील ३१ प्रमुख पदाधिकारी आणि १८५ कार्यकर्त्यांना पोलीसांनी नोटीसा बजावल्या आहेत. लोणेरे येथे ५ जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणारा ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा ठाकरे गटाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून चांगल्या वर्तणूकीचा बॉन्ड लिहून घेतला जाणार आहे.
शासन आपल्या दारी हा कार्यक्रम माणगाव तालुक्यात लोणेरे येथे ५ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व इतर मंत्री उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला ७५ हजार लोक येण्याची शक्यता आहे. जर कोणी हा कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला तर चेंगराचेगरी होऊन मोठी दुर्घटना घडू शकते. सनदशीर मार्गाने आपल्या भावना व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. शासन आपल्या दारी हा शासकीय कार्यक्रम आहे. त्यात कुणी अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई करण्यात येईल. आतापर्यंत ३१ जणांवर कलम १०७ नुसार कारवाई करण्यात आली आहे. कलम १४९ नुसार १८५ जणांना नोटिस बजावण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.
हेही वाचा : जयंत पाटलांबरोबरच्या वादामुळे रोहित पवार पक्षाच्या शिबिराला गैरहजर? प्रदेशाध्यक्ष म्हणाले, “जे सोबत येतील…”
मात्र ही दडपशाही असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे माणगाव तालुका प्रमुख गजानन अधिकारी यांनी शासकीय यंत्रणेच्या या भूमिकेचा निषेध केला आहे. सत्तेचा वापर करून लोकशाहीचा गळा दाबण्याचे काम हे सरकार करीत आहे. मात्र आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. आम्ही ५ जानेवारीला काळे झेंडे दाखवत निषेध मोर्चा काढणार असल्याचे अधिकारी यांनी सांगितले.
हेही वाचा : “६ तारखेला अयोध्येत जे घडलं ते…”, अटल बिहारी वाजपेयी तेव्हा काय म्हणाले होते? राऊतांनी ट्वीट केला Video!
काय आहे प्रकरण
शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या कथित अवमानकारक वक्तव्याचा निषेध करण्यासाठी ठाकरे गटाचे शिवसैनिक महाड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमले होते. निषेधाचा कार्यक्रम सुरू असताना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी ५ तारखेला आंदोलनाची घोषणा ठाकरे गटाने केली आहे.
