सोलापूर : भाजप आणि कम्युनिस्ट हे पक्ष म्हणजे दोन टोकाच्या उजव्या आणि डाव्या विचारांचे पक्ष. दोघेही एकमेकांना प्रथम क्रमांकाचे शत्रू मानत आले असताना सोलापुरात मात्र या दोन्ही विचारधारांचे सध्या मनोमीलन दिसत आहे. निमित्त आहे सोलापुरात असंघटित कामगारांच्या घरांच्या हस्तांतर सोहळ्याचे. या प्रकल्पाचा मूळ प्रस्ताव कम्युनिस्ट नेते नरसय्या आडम यांनी दिलेला होता, तर त्याला प्राधान्याने मूर्त रूप देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. यामुळे शुक्रवारी (दि.१९) कार्यक्रमाच्यानिमित्ताने देशात हे असे अनोखे मनोमीलन पाहण्यास मिळत आहे.

अक्कलकोट रस्त्यावर कुंभारी येथे सुमारे ३५० एकर क्षेत्रात हा प्रकल्प उभा राहिला आहे. या प्रकल्पासाठी आडम यांनी पुढाकार घेतला होता. मात्र राजकीय बळाअभावी तो दुर्लक्षित राहिला होता. पुढे आडम यांनी याप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत त्यांना हा प्रकल्प समजावून सांगितला. यानंतर मोदी यांनी एका कम्युनिस्ट नेत्याने असंघटित कामगारांसाठी योजलेल्या या योजनेला बळ दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच २०१९ मध्ये या महत्त्वाकांक्षी पथदर्शी प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली. या वेळी बोलताना आडम यांनी आपल्या भाषणात ‘आजवर दुर्लक्षित या योजनेस बळ देत पंतप्रधान म्हणून तुम्ही भूमिपूजन केले. या घरांच्या चाव्या देण्यासाठीही पंतप्रधान म्हणून तुम्ही यावे’ असे वक्तव्य केले होते. आता या घरांचे काम पूर्ण होत आले असून यातील पहिल्या टप्प्यातील १५ हजार घरांचे या असंघटित कामगारांना उद्या शुक्रवारी वितरण केले जाणार आहे.

हेही वाचा : “दावोस दौऱ्यात ३ लाख ५३ हजार कोटींचे सामंज्यस करार, दोन लाख रोजगार निर्मिती होणार”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती

यावेळी त्यांची जंगी जाहीरसभाही होणार आहे. सभास्थळी प्रवेशद्वारापासून ते सुमारे पाच लाख चौरस फुटाच्या भव्य शामियान्यात जागोजागी माकपचे लाल बावटे मोठ्या प्रमाणावर उभारण्यात आले आहेत. या लाल बावट्यांना खेटूनच भाजपचे झेंडे आणि शिवसेनेचे भगवे झेंडेही एकत्र दिसणार आहेत. सभेला असंघटित कामगार, त्यांचे कुटुंबीय, सोलापूर जिल्ह्यातील जनतेसोबतच भाजप आणि कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. सभा नियोजनासाठी माकप व भाजपमध्ये समन्वय दिसून येतो आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे ठाण मांडून आहेत. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांशी संवाद साधताना स्वतःची मूळ ओळख विसरत नाहीत. मोबाइलवर किंवा प्रत्यक्ष भेटीत कम्युनिस्ट (काॅम्रेड) कार्यकर्ता ‘लाल सलाम’ म्हणतो, त्याच वेळी त्याला प्रतिसाद देताना भाजप कार्यकर्ता जय श्रीराम म्हणायला विसरत नाही. आजवर देशात कायम एकमेकांच्या विरोधात लढलेल्या या दोन विचारधारांचे हे अनोखे मनोमीलन सध्या या कार्यक्रमात चर्चेचा विषय झाला आहे.

हेही वाचा : राज्यसेवा मुख्य परीक्षेत विनायक पाटील राज्यात प्रथम; ‘एमपीएससी’कडून २०२२ ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर

नरेंद्र मोदी यांची मदत

“माकप आणि भाकपचे भाजप आणि संघ परिवाराशी टोकाचे वैचारिक मतभेद कायम आहेत. परंतु सोलापुरात ३० हजार असंघटित कामगारांना रे नगर योजनेतून हक्काची घरे मिळवून देण्यासाठी आपल्या प्रयत्नांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी मदत केली. विकासकामे करताना पक्षीय विचारधारेच्या पलीकडे जाण्याचा त्यांचा हा वस्तुपाठ लक्षात राहणारा आहे. यात मोदी यांची माणुसकीही दिसून आली. या महत्त्वाकांक्षी गृहप्रकल्पाचे राजकीय श्रेय सत्ताधारी पक्ष म्हणून भाजप घेणार असेल तर हरकत नाही. उलट, या गृहप्रकल्पाला तत्कालीन काँग्रेसच्या सत्ताकाळात दहा वर्षे अडथळाच झाला. त्यामुळे राजीव गांधी यांच्या नावाने रे नगर योजना राबविण्यातही काँग्रेसचे नेते अडचणी निर्माण करीत होते. दरम्यान मोदी सरकारतर्फे अशा योजनांसाठी ‘प्रधानमंत्री आवास योजना’ असा शब्दप्रयोग आहे. मात्र सोलापूरबाबत हा अपवाद करत मोदी यांनी पूर्वीच दिलेले ‘रे नगर’ हे राजीव गांधींशी संबंधित नाव कायम ठेवले.” – नरसय्या आडम मास्तर, मुख्य प्रवर्तक, रे नगर फेडरेशन