अकोल्यातील शिवणी विमानतळ अडगळ ठरले आहे. ‘शिवणी’चे विस्तारीकरण अनेक दशकांपासून रखडले आहे. निधी देण्याची वारंवार केवळ घोषणा केली जाते. प्रत्यक्षात सर्वच पक्षांच्या सत्ता काळात शिवणीला वाटाण्याच्या अक्षता मिळाल्या. अमरावती जिल्ह्यातील बेलोरा विमानतळाचे काही वर्षांतच विस्तारीकरण होऊन हवाई वाहतूकही सुरू झाली. अकोला जिल्ह्यात अनेक वर्षांपासून भाजपचे वर्चस्व असतांना शिवणी विमानतळाचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने विरोधक सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची फिरकी घेतात. सत्ताधाऱ्यांमध्येही याविषयी अंतर्गत खदखद आहे. बेलोरा विमानतळाच्या लोकार्पण कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘माझे मामेकुळ अमरावती असल्याने येथील विकासकामे कामे प्राधान्याने पूर्ण होतील,’ असे म्हणाले. तोच धागा पकडून सत्ताधारी भाजपचा एक पदाधिकारी गंमतीने म्हणाला, ‘देवेंद्रजींची कर्मभूमी नागपूर, तर अमरावती येथे मामेकुळ असल्याने दोन्ही ठिकाणचा वेगाने विकास होतो. त्यांचे अकोल्यात कोणी नातेवाईक आहे का, हे शोधावे लागेल…’
नसता जीवाला घोर !
गावच्या पंचायतीची नसली तरी तालुक्याच्या पंचायतीच्या आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार असे दिसू लागताच, गावच्या पुढाऱ्यांची धावपळ तर बघायलाच नको इतकी वाढली आहे. सध्या लग्नसराईची धूमधाम सुरू आहे. एकेका दिवशी चार-चार लग्नांची आवातनं असतात. ‘आता मतांसाठी का हुईना तांदळाला जावंच लागतयं ना भाऊ, लग्नाला गेल्यावर स्पीकरवाला वळकिचा असला तर ‘गावचं उगवतं नेतृत्व आणि आमचं काळीज’ म्हणत नाव पुकारायला रातची एखादी क्वार्टर द्यायला नगं का? या क्वार्टरवर तर प्रचाराचा धुरळा उडणार असतुया. आता सासू नगं म्हणून वाईली राहिली आणि सासूच वाटणीला आली तर…. नसता जीवाला घोर’.
सभापती काँग्रेसचा, सत्ता भाजपची
कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीत स्वत:ची फारशी ताकद नसतानाही भाजप विरूद्ध भाजप अशीच लढत झाली. दुसरीकडे काँग्रेसची मजबूत ताकद असतानाही या पक्षाच्या नेत्यांना स्वपक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना दूर ठेवून भाजपची मदत घ्यावी लागली. अपेक्षेप्रमाणे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने हे बाजार समितीचे सभापती झाले. बाजार समितीची सत्ता वर्षानुवर्षे काँग्रेसच्या ताब्यात असूनही सत्ताकारण सांभाळताना ही राजकीय अपरिहार्यता होती. यात भाजपचे जिल्हाध्यक्ष, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी हे सूत्रधार ठरले आहेत. स्पष्ट बहुमत असूनही सत्ता राखताना काँग्रेस नेत्यांना भाजपचे आमदार कल्याणशेट्टी यांची प्रत्येक गोष्ट ऐकावी लागली. या लढाईत तोंडघशी पडलेल्या भाजपच्या दोन्ही आमदार देशमुखांचे गणित बिघडले आहे. राज्यात सध्या महायुतीत प्रवेश करण्याचा ओघ वाढला आहे. सोलापूरमध्ये हा चमत्कार होतो का, नवीन सभापतीही त्याच मार्गाने जातात, याचीच साऱ्यांना उत्सुकता आहे.
आधी दटावले, आता सुखावले!
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काका ग्रंथप्रेमी वाचक आहेत, हे महाराष्ट्राला ठाऊक आहे. पुतण्याने त्यांची राजकीय साथ, त्यांचे विचार सोडले असले, तरी पुस्तकप्रेमाचा त्यांचा गुण मात्र स्वीकारला आहे. अलीकडच्या नांदेड दौऱ्यात फटकळ पुतण्याने स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना पुष्पगुच्छावरून दटावले, ‘हे कशासाठी, त्याऐवजी पुस्तके द्या…’ असे ते म्हणाले होते. तेथे हजर असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंत्रीमहोदयांचे ते बोल ऐकले. त्यानंतर रविवारी नांदेड दौऱ्यावर आलेल्या पवार यांच्या स्वागतप्रसंगी पुष्पगुच्छ गायब झाल्याचे दिसले. प्रशासनातील चार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे ग्रंथभेट देऊन स्वागत केल्यानंतर अजितदादाही आश्चर्यचकित झाले.