"शरद पवारांनी उचललेल्या पावलाचा अर्थ कळण्यास...", पहाटेच्या शपथविधीबाबत केलेल्या खळबळजनक विधानापासून जयंत पाटलांचा यू-टर्न | jayant patil took u turn on statement on sharad pawar and devendra fadnavis ajit pawar early oath taking rmm 97 | Loksatta

“शरद पवारांनी उचललेल्या पावलाचा अर्थ कळण्यास…”, पहाटेच्या शपथविधीबाबत केलेल्या खळबळजनक विधानापासून जयंत पाटलांचा यू-टर्न

जयंत पाटील यांनी आपल्या विधानावरून घूमजाव केला आहे.

jayant patil on sharad pawar
फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकतंच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीबाबत मोठं विधान केलं. पहाटेचा शपथविधी ही शरद पवारांची राजकीय खेळी असू शकते, अशा आशयाचं विधान जयंत पाटील यांनी केलं. जयंत पाटलांच्या या विधानानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. यावर विविध राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया येत असताना जयंत पाटील यांनी आपल्या विधानावरून घूमजाव केला आहे.

पहाटेचा शपथविधी ही शरद पवारांची खेळी होती, असं मी बोललो नाही. तो माझा कयास होता. शरद पवार आम्हाला विचारून राजकीय पावलं टाकत नाहीत, असं विधान जयंत पाटलांनी केलं. ते ‘टीव्ही ९ मराठी’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

हेही वाचा- पहाटेच्या शपथविधीबाबत जयंत पाटलांच्या खळबळजनक दाव्यावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले…

संबंधित विधानावर स्पष्टीकरण देताना जयंत पाटील म्हणाले, “पहाटेचा शपथविधी ही खेळी होती, असं मी बोललो नाही. तो एक अंदाज आहे. तो मझा कयास आहे. शरद पवार आम्हाला विचारून पावलं टाकत नाहीत. त्यांनी आम्हाला विचारून निर्णय घ्यावेत, असं आम्हाला अजिबात वाटत नाही. आम्ही फार ज्युनिअर आहोत. पण शरद पवारांनी एखादी गोष्ट केली तर त्याचा अर्थ कळण्यास बराच वेळ लागतो. त्यामुळे त्या काळातला घटनाक्रम बघितला तर, त्या घटनेचा फायदा नवीन सरकार स्थापन होण्यास झाला, हे नाकारून चालणार नाही. शरद पवारांनी ते जाणूनबुजून केलं, असं मी म्हणालो नाही. पण त्या घटनेचे फायदे काय झाले? हे मी त्यांना सांगत होतो.

हेही वाचा- “आमच्या जागेवर अतिक्रमण केल्यास…”, मिरजेतील वादग्रस्त जागेबाबत गोपीचंद पडळकर आक्रमक!

जयंत पाटील नेमकं काय म्हणाले होते?

देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीवर भाष्य करताना जयंत पाटील म्हणाले, “मला वाटत नाही की अजित पवार काही बोलले असतील. पण त्यावेळी राज्यात (२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर) राष्ट्रपती राजवट लागू होती. राष्ट्रपती राजवट उठवल्याशिवाय काही पर्याय नव्हता. त्या अनुषंगाने केलेली ही एक खेळी असू शकते. त्यामुळे मला वाटत नाही की त्याला यापेक्षा जास्त काही महत्त्व आहे. त्यावेळी अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यांना आज महत्त्व नाही. त्यानंतर अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम केले. या काळात त्यांनी स्पष्टपणे कारभार केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला नाही. आता शिवसेनेचे आमदर फुटल्यामुळे सरकार कोसळले. पण राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरेंना शेवटपर्यंत ठामपणे साथ दिली, हे नाकारता येणार नाही.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-01-2023 at 16:38 IST
Next Story
पुणे – सातारा मार्गावर वाहनांची गर्दी; पाचगणी, महाबळेश्वरला जाणारा पसरणी घाटही हाऊसफुल्ल