Keshav Upadhye On Uddhav Thackeray : राज्य सरकारच्या पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाची सध्या राज्यात मोठी चर्चा सुरु आहे. या निर्णयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलंच राजकारण तापलं आहे. या निर्णयाच्या विरोधात दोन्ही ठाकरे बंधू मैदानात उतरले आहेत. शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषिक आणीबाणीला शिवसेनेचा प्रखर विरोध असून जबरदस्तीने राबविण्यात येणारा हिंदी सक्तीचा कार्यक्रम हाणून पाडण्याचा इशारा दिला आहे. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील मैदानात उतरले आहेत. हिंदी भाषेच्या या निर्णयाविरोधात ५ जुलै रोजी मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे.
दरम्यान, हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयावरून उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या सरकारच्या निर्णयाला विरोध करत हिंदी सक्तीच्या जीआरची होळी करा, असे निर्देश पदाधिकाऱ्यांना दिल्याची चर्चा आहे. मात्र, यावरूनच आता भाजपाचे नेते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.’हे तर पुतना मावशीचे प्रेम’ असल्याचं केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे. तसेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मराठी शाळांची आठवण झाली नाही का? यासह अनेक सवाल देखील केशव उपाध्ये यांनी केले आहेत. या संदर्भात त्यांनी एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट शेअर केली आहे.
केशव उपाध्ये यांनी काय म्हटलं?
“…हे तर पुतना मावशीचे प्रेम, उद्धव ठाकरे यांनी मराठी सक्तीच्या जीआरची होळी करण्याचा आदेश दिला आहे. मराठी सक्ती सांगणाऱ्या जीआरची होळी? हे यांचं मराठी प्रेम? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना उर्दू भवनची घोषणा केली, त्यावेळी मराठी शाळांच्या दुरावस्थेची आठवण आली नाही? मुंबई महापालिकेमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना वर्षानुवर्षे सत्तेवर होती. मुंबई महापालिकेच्या मराठी शाळांची संख्या गेल्या १५ वर्षात ४०० वरून २८० पर्यंत खाली आली. याच शाळांतील विद्यार्थी संख्याही लाखांहून ३५ हजारांवर आली. काही शाळा बंद कराव्या लागत आहेत. कुठे गेलं उद्धव ठाकरे यांचं मराठी प्रेम?”, असं केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.
…हे तर पुतना मावशीचे प्रेम!
— Keshav Upadhye (@keshavupadhye) June 28, 2025
उद्धव ठाकरे यांनी मराठी सक्तीच्या GR ची होळी करण्याचा आदेश दिला आहे, मराठी सक्ती सांगणाऱ्या जीआरची होळी? हे यांचं मराठी प्रेम?
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना उर्दू भवनची घोषणा केली, त्यावेळी मराठी शाळांच्या दुरावस्थेची आठवण आली नाही?
मुंबई…
राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षावरही टीका
“सांगण्यासारखा आणखी एक मुद्दा…, शरद पवार गटाने २०२० मध्ये हिंदी भाषा जोडो अभियान केले होते, त्याचं उद्धाटन जयंत पाटील यांनी केले होते. आता ते हिंदी विरोधी मोर्चात सहभागी होत आहेत”, असं म्हणत केशव उपाध्ये यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षावर टीका केली आहे.