Amit Shah on MVA Alliance: विधानसभा निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी आता सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. आजपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारात उतरले आहेत. तर महाविकास आघाडीसाठी राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे हेदेखील प्रचारसभांचा धडाका लावत आहेत. सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे आज अमित शाह यांची सभा पार पडली. या सभेत अमित शाह यांनी महाविकास आघाडीवर आणि विशेष करून शरद पवारांवर जोरदार टीका केली. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेल्या एका विधानामुळे आता राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा…’

अमित शाह यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला शिराळा येथे समर्थ रामदास स्वामींना अभिवादन केले. तसेच २० नोव्हेंबर रोजी डबल इंजिनचे सरकार आणण्यासाठी महायुतीला मतदान करण्याची भूमिका घ्या, असे सांगितले. “मी लोकसभेलाही संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला होता. त्यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरलो. जनतेची एकच भावना आहे की, आपल्याला पुन्हा एकदा महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना विजयी करायचे आहे”, असे विधान अमित शाह यांनी केले.

शरद पवार तुम्ही कितीही जोर लावा…

अमित शाह पुढे म्हणाले की, औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर व्हायला हवे की नको? पण महाविकास आघाडीचे नेते याला विरोध करत आहेत. जे स्वतःला बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार म्हणवून घेतात, ते उद्धव ठाकरेही या नामकरणाला विरोध करत आहेत. मी शरद पवारांना आज आव्हान देतो, तुम्ही कितीही जोर लावा पण संभाजीनगरचे नाव छत्रपती संभाजीनगरच राहणार. तसेच जम्मू-काश्मीरमध्ये आम्ही कलम ३७० हटविले. संपूर्ण देशाने याला पाठिंबा दिला. मात्र उद्धव ठाकरे आणि शरद पवार याला विरोध करत आहेत. मी आज शरद पवार यांना आव्हान देतो की, तुमच्या चार पिढ्या आल्या तरी कलम ३७० पुन्हा आणू शकत नाहीत.

ते राम मंदिराच्या दर्शनाला गेले नाहीत

अमित शाह पुढे म्हणाले, “शरद पवार यांनी राम मंदिर निर्माणानंतर सांगितले की, मी नंतर जाईल. पण ते अद्याप दर्शनाला गेले नाहीत. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेही गेले नाहीत. ते का गेले नाहीत? हा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेने विचारावा, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. कारण त्यांना आपली मतपेटी सांभाळायची आहे. म्हणून ते राम मंदिरात दर्शनासाठी गेले नाहीत. पण आम्ही त्यांच्या मतपेटीला घाबरत नाहीत.”

शिराळात नागपूजा होणारच

शिराळामध्ये नागपंचमीनिमित्त खऱ्या नागांची पूजा केली जात असे. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर या परंपरेवर बंदी घालण्यात आली आहे. याबद्दल बोलताना अमित शाह म्हणाले, परंपरागत नाग पूजा करण्यास आमचा विरोध नाही. नाग पूजा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. याला कुणीही रोखू शकत नाही, असेही अमित शाह यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly election 2024 amit shah rally in shirala slams maha vikas aghadi kvg