Maharashtra News Live Updates 31 May 2022 : राज्यसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये राज्याच्या राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. संभाजीराजे छत्रपतींनी उमेदवारी मागे घेतली असली तरी त्यांच्या उमेदवारीच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप केला जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शिमल्यामधील गरीब कल्याण रॅलीकडेही देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे. सत्तेत आठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांच सार्वजनिक मंचावरुन भाष्य करणार आहे. तर दुसरीकडे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या चौंडी (ता. जामखेड) येथे मंगळवारी (दि. ३१) होणाऱ्या अहिल्यादेवींच्या जयंती सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार प्रदीर्घ काळानंतर उपस्थित राहणार आहेत. त्यांचे नातू व कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी त्यांना निमंत्रित केले आहे. त्याच वेळी शरद पवार यांच्यावर सातत्याने हल्लाबोल चढवणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अहिल्यादेवी जागर यात्रेचा समारोपही जयंतीदिनी चौंडीत होणार आहे. पवार व पडळकर हे विरोधक एकाच ठिकाणी येत असल्याने संघर्ष अटळ ठरण्याची चिन्हे आहेत.

येस बँक आणि दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमि.च्या (डीएचएफएल) माध्यमातून करण्यात आलेल्या गैरव्यवहाराप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केलेल्या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या कोठडीवर विशेष सीबीआय न्यायालय आज निर्णय देणार आहे. करोनासंदर्भातील आकडेवारीही थोडी चिंतेत टाकणारी आहे. सोमवारी राज्यात करोनाचे ४३१ नवे रुग्ण आढळले असून शून्य मृत्यूची नोंद झाली. मुंबईतील दैनंदिन करोना रुग्णसंख्या ३०० च्या पुढे गेली असून सोमवारी ३१८ नवीन रुग्णांची नोंद झाली. रुग्णांना लक्षणे नसली तरी रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे रुग्णवाढीचा दर वाढला असून रुग्ण दुपटीचा कालावधी कमी झाला आहे. हे आणि असे अनेक विषय चर्चेत आहेत.

अशा अनेक महत्वाच्या घडामोडी राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्ही आता एकाच ठिकाणी वाचू शकता.

Live Updates

Maharashtra Latest News Updates : राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावरील तसंच इतर क्षेत्रातील सर्व घडामोडी जाणून घ्या

10:50 (IST) 31 May 2022
उद्धव ठाकरे २५ वर्ष मुख्यमंत्री राहतील – संजय राऊत

राज्यात महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्ष पूर्ण झाली आहेत. समान किमान कार्यक्रमाच्या आधारे महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यात आलं. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा होऊ दे असं साकडं घातलं आहे. यावर शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे २५ वर्ष मुख्यमंत्री राहतील असं संजय राऊत म्हणाले आहेत.

सविस्तर बातमी

10:47 (IST) 31 May 2022
“हा राजकीय कार्यक्रम नाही, कुणीही…”; अहिल्यादेवींच्या जयंती सोहळ्यानिमित्त विरोधकांना इशारा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या चौंडी येथे मंगळवारी अहिल्यादेवींच्या जयंती सोहळ्या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार प्रदीर्घ काळानंतर उपस्थित राहणार आहेत. कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी त्यांना निमंत्रित केले आहे. त्याच वेळी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अहिल्यादेवी जागर यात्रेचा समारोपही जयंतीदिनी चौंडीत होणार आहे. पवार व पडळकर हे विरोधक एकाच ठिकाणी येत असल्याने संघर्ष अटळ ठरण्याची चिन्हे आहेत. याबाबात बोलताना रोहित पवार यांनी हा राजकीय कार्यक्रम नाही असे म्हटले आहे.

10:34 (IST) 31 May 2022
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्याआधी आमचं घर नव्हतं, आम्ही हवेत रहायचो : नितेश राणे

कोल्हापूरमध्ये घेतलेल्या पत्रकारपरिषदेत नितेश राणेंना मुंबईतील जुहूमधील घरासंदर्भातील नोटीशींबद्दल प्रश्न विचारण्यात आला त्यावर उत्तर देताना, “सगळ्याच नियमांचं उल्लंघन आम्ही उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री बनल्यानंतरच केलेलं आहे,” असं उत्तर दिलं. येथे वाचा सविस्तर वृत्त

10:32 (IST) 31 May 2022
२५ वर्षानंतर सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्री पदी नंबर लागावा हीच ईश्वराकडे आमची प्रार्थना – अब्दुल सत्तार

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने नुकतेच सत्तेचे अडीच वर्षे पूर्ण केले आहेत. मात्र अद्यापही तिन्ही पक्षांपमध्ये धुसफूस कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. असे असले तरी तिन्ही पक्षातील वरिष्ठ नेते सर्व काही ठिक असल्याचे कायम सांगत आले आहेत. अशात आता मुख्यमंत्री पदाबाबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक विधान केले आहे. यावरुन आता शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

10:31 (IST) 31 May 2022
क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला क्लीन चिट मिळाल्यानंतर समीर वानखेडेंची बदली

क्रूझ ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करणारे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी समीर वानखेडे यांची चेन्नईला बदली करण्यात आली आहे. आदेशानुसार, समीन वानखेडे यांची डायरेक्टरेट जनरल ऑफ अॅनालिटिक्स अँड रिस्क मॅनेजमेंट (डीजीआरएम) मुंबई येथून चेन्नईचे करदाता सेवा महासंचालनालय येथे बदली करण्यात आली आहे.

10:15 (IST) 31 May 2022
“तुम्हाला घरात घुसून मारु,” भाजपा नेत्यांच्या इशाऱ्यावर दिपाली सय्यद यांनी दिलं उत्तर

अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दिपाली सय्यद पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेमुळे सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. दिपाली सय्यद यांनी मोदींवर आक्षेपार्ह टीका केल्यानंतर भाजपा नेत्या उमा खापरे यांनी त्यांना इशारा दिला असून घरात घुसून बदडून काढू असं म्हटलं आहे. त्यानंतर दिपाली सय्यद यांनीही टीव्ही ९ शी बोलताना त्यांना प्रत्युत्तर दिलं असून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाला काही किंमत नाही का? अशी विचारणा केली आहे. तसंच माझ्या घरी येऊन दाखवा असं प्रतीआव्हानही दिलं आहे.

सविस्तर बातमी

10:14 (IST) 31 May 2022
विभास साठे यांचा मनसुख हिरेन होऊ नये – किरीट सोमय्या

Anil Parab ED Raid: शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित सात ठिकाणांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) २७ मे रोजी छापेमारी केली. ईडीने मुंबईसह पुणे आणि रत्नागिरी अशा एकूण सात ठिकाणी छापे टाकले होते. अनिल परब यांना दापोलीमधील जमीन विकणाऱ्या विभास साठेंच्या कोथरुडमधील घरावरही छापा टाकण्यात आला होता. विभास साठे यांच्या कोथरुडमधील कार्यालयात छापेमारी करण्यात आली होती. दरम्यान भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी विभास साठेंचा मनसुख हिरेन होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली आहे.

सविस्तर बातमी

10:09 (IST) 31 May 2022
Jammu-Kashmir Encounter: अवंतीपोरात सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत २ दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथे झालेल्या चकमकीत भारतीय सुरक्षा दलांना मोठं यश आलं आहे. मंगळवारी सकाळी अवंतीपोरा परिसरात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार केलं आहे. यानंतर सुरक्षा दलाने दहशतवाद्यांकडून दोन एके-४७ रायफलसह काही संवेदनशील साहित्य जप्त केलं आहे. ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एकाचा दोन काश्मिरींच्या हत्येत सहभाग होता. सविस्तर बातमी

10:08 (IST) 31 May 2022
World No Tabaco Day: सिगारेट सोडल्याने एवढे पैसे वाचले की त्यामधून साकारलं मोठ्या घराचं स्वप्न; केरळच्या आजोबांची गोष्ट

तंबाखू तसेच धुम्रपान सोडल्याने केवळ आरोग्यविषय फायदा होतो असं नाही तर त्यामधून त्या व्यसनांवर खर्च होणारा पैसाही मोठ्याप्रमाणात वाचतो. अशाचप्रकारे धुम्रपान सोडल्याने केरळमधील एका व्यक्तीला एवढा आर्थिक फायदा आणि बचत झाली की त्याने सिगारेटवर खर्च होणाऱ्या पैशांमधून चक्क मोठ्या घर बांधण्याचं आपलं अनेक वर्षांचं स्वप्न पूर्ण केलं आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त

10:07 (IST) 31 May 2022
संजय राऊत – छत्रपती शाहू महाराज भेटीबद्दल बोलताना नितेश राणेंचा तोल सुटला; म्हणाले, “शाहू महाराजांचं मी खरंच…”

संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेकडून राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण आरोप प्रत्यारोपांमुळे तापलेलं असतानाच रविवारी शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी कोल्हापूरचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी श्रीमंत शाहू महाराज यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली. त्यानंतर राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये आपली भूमिका स्पष्ट करतानाच विरोधकांवर निशाणा साधला. मात्र या साऱ्या घटनाक्रमावर भाष्य करताना भाजपाचे आमदार नितेश राणे यांचा तोल सुटला आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त

10:06 (IST) 31 May 2022
“राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये संजय राऊतांनी आग लागवली; आता त्यांची मजल छत्रपतींच्या घरापर्यंत गेलीय”

“संजय राऊतांचा घर फोडण्याचा इतिहास आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये भांडणं लावण्यात ज्या काही व्यक्ती पुढे होत्या त्यात संजय राऊतांचा समावेश होता. आता त्यांची मजल छत्रपतींचं घर फोडण्यापर्यंत गेलीय,” अशी गंभीर टीका भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी सोमवारी सायंकाळी कोल्हापूरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेकडून राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण आरोप प्रत्यारोपांमुळे तापलेलं असतानाच याच मुद्द्यावरुन नितेश राणेंनी थेट श्रीमंत शाहू महाराज यांची भेट घेणार संजय राऊतांवर निशाणा साधलाय. येथे वाचा सविस्तर वृत्त

10:06 (IST) 31 May 2022
“बँकांपुढील रांगांमध्ये तासनतास उभे राहावे लागल्याने ज्यांना…”; नोटाबंदीने काय साध्य झाले? असं विचारत शिवसेनेची मोदींवर टीका

देशभरात बनावट नोटांचा सुळसुळाट सुरू असून, बँकिंग प्रणालीतून पकडण्यात आलेल्या बनावट नोटामध्ये मागील वर्षभरात झालेल्या वाढीतून हे स्पष्ट होत आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या वार्षिक अहवालात, सर्वाधिक पकडल्या गेलेल्या बनावट नोटा या ५०० आणि २,००० रुपये अशा सर्वोच्च मूल्यातील असून, मागील वर्षभरात त्यांचे प्रमाण अनुक्रमे १०१.९३ टक्के आणि ५४ टक्के असे वाढले आहे. याच मुद्द्यावरुन आता शिवसेनेनं सत्ताधारी भाजपा सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटबंदीच्या निर्णयावर निशाणा साधलाय. येथे वाचा सविस्तर वृत्त नेमकं शिवसेनेनं काय म्हटलंय…

अनेक महत्वाच्या घडामोडी राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्ही आता एकाच ठिकाणी वाचू शकता.