सांताक्रूझ येथील जुहू तारा रोडवरील केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या आठ मजली ‘अधिश’ बंगल्यामधील अनधिकृत बांधकाम नियमित करण्यास मुंबई महापालिकेने मागील महिन्यामध्ये नकार दिला. या संदर्भात सादर केलेल्या अर्जामध्ये आवश्यक ती कागदपत्रे न जोडल्यामुळे पालिकेने अनधिकृत बांधकाम नियमित करण्यास नकार दिला आहे. त्याचबरोबर पालिकेने राणे यांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी १५ दिवसांची मुदतही दिली होती. याचसंदर्भातील प्रकरण सध्या न्यायालयामध्ये असतानाच आता घरामधील बांधकामासंदर्भातील प्रकरणावरुन नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी उपहासात्मक प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.

नक्की वाचा >> संजय राऊत – छत्रपती शाहू महाराज भेटीबद्दल बोलताना नितेश राणेंचा तोल सुटला; म्हणाले, “शाहू महाराजांचं मी खरंच…”

कोल्हापूरमध्ये सोमवारी घेतलेल्या पत्रकारपरिषदेत नितेश राणेंना मुंबईतील जुहूमधील घरासंदर्भातील नोटीशींबद्दल प्रश्न विचारण्यात आला त्यावर उत्तर देताना, “सगळ्याच नियमांचं उल्लंघन आम्ही उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री बनल्यानंतरच केलेलं आहे,” असं उत्तर दिलं. “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्याआगोदर तर आमचं घर नव्हतं तिथे आम्ही हवेत रहायचो,” असा उपाहासात्मक टोलाही नितेश राणेंनी लगावलाय.

“या आगोदरच्या कुठल्याही मुख्यमंत्र्यांना आमच्या घरामध्ये सीआरझेडचं उल्लंघन झालंय असं दिसलं नाही. हे उद्धवजींनाच दिसलं मुख्यमंत्री झाल्यावर. त्याचं काय कायदेशीर उत्तर द्यायचंय ते देऊ,” असं नितेश राणे म्हणाले. तसेच सीआरझेडसंदर्भात नोटीसही आल्याचं त्यांनी नमूद केलं. “आम्हाला ती सीआरझेडची नोटीस मिळालीय त्याचं कायदेशीर उत्तर देऊ पण सगळ्या काही ज्या अनियमितता आमच्या घरामध्ये इतर सगळ्या गोष्टींमध्ये आल्यात हे उद्धवजी मुख्यमंत्री झाल्यानंतरच दिसत आहेत. आगोदर कोणाला दिसल्या नाहीत,” असा टोलाही नितेश यांनी लगावला.

नक्की वाचा >> “किमान राजघराण्यातील व्यक्तींनी…”; संजय राऊतांचा एकेरी उल्लेख करत निलेश राणेंचा छत्रपतींच्या घराण्याला सल्ला

“हे जाणीवपूर्वक केलंय असं वाटतंय का?,” असा प्रश्न पत्रकारांनी नितेश यांना विचारला. त्यावर उत्तर देताना नितेश यांनी, “आम्ही आमच्या जुहूच्या घरी गेल्या १२ वर्षांपासून राहतोय. मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र सरकार, सीआरझेडचे नियम आताच जन्माला आलेले नाहीत. लोकांना सरळ सरळ दिसतंय. म्हणूनच म्हणतोय की उद्धवजी मुख्यमंत्री झाल्यावर नोटीस यायला लागल्या,” असं म्हटलं.

नक्की वाचा >> “राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये संजय राऊतांनी आग लागवली; आता त्यांची मजल छत्रपतींच्या घरापर्यंत गेलीय”

पुढे बोलताना, “मैदानात लढण्याची हिंमत नाही म्हणून अशा वेगवगेळ्या बालिश गोष्टी करायच्या. पण कायदा आहे, लोकशाही आहे आम्हाला जे काही उत्तर द्यायचंय ते कायदेशीर देऊ,” असा टोलाही नितेश राणेंनी लगावला.

याच प्रकरणावरुन दोन आठवड्यांपूर्वी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचं घर बेकायदेशीरपणे बांधण्यात आल्याचा दावा केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केला होता. मुंबई महानगरपालिकेनं फेब्रुवारी २०२० मध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना एक नोटीस बजावली होती. राणे यांनी महापालिकेची परवानगी न घेता जुहू येथे बंगला बांधल्याचा आरोप संबंधित नोटीशीत केला होता. तसेच संबंधित कायदपत्रे दाखवले नाहीत, तर अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात येईल, असा इशाराही महापालिकेनं दिला होता. पण केंद्रीय मंत्र्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले असून यासंदर्भात न्यायालयीन लढाई सुरु आहे.