Maharashtra Rain News Highlights: मुंबईतील वांद्रे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेची (शिंदे) महत्त्वाची बैठक पार पडली. शिंदे यांनी या बैठकीत आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांसदर्भात आढावा घेतला. तसेच शिवसेनेने (शिंदे) नवीन अ‍ॅपच्या माध्यमातून पदाधिकारी नोंदणी करण्यास सुरुवात केली आहे. “बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकला तसाच मुंबई मनपात महायुतीचा झेंडा फडकवायचा आहे” अशा सूचना एकनाथ शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दुसऱ्या बाजूला शिखर बँक घोटाळा प्रकरणात आमदार रोहित पवार (राष्ट्रवादी – शरद पवार) यांना समन्स बजावण्यात आलं आहे. यासह आज न्यायालयात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासंबंधीच्या घडामोडींवर आपलं लक्ष असेल.

उपमुख्यमंत्री अजित पवार आज वर्धा दौऱ्यावर असून या दौऱ्याचे अपडेट्स आपण पाहणार आहोत. वर्ध्यात पोहोचताच अजित पवारांनी जिल्ह्याधिकाऱ्यां नाविचारलं की सर्व वाहनांवरील नेमप्लेट्सचे रंग एकसारखे का नाहीत? बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनेलचा पराभव झाल्याने भाजपाने मुंबईत ठिकठिकाणी बॅनरबाजी करत ठाकरे बंधुंना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी ‘ठाकरे ब्रँड कोमात, देवाभाऊ जोमात’ असे होर्डिंग्स अनेक ठिकाणी लावले आहेत. यावर शिवसेना (ठाकरे) व मनसेकडून काय प्रतिक्रिया येतेय याकडे सर्वांचं लक्ष आहे.

मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील छत्रपती संभाजीनगरमध्ये येत्या २४ ऑगस्ट रोजी इशारा सभा घेणार आहेत. त्यानंतर २९ ऑगस्ट रोजी मुंबईत उपोषण करण्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केला आहे. यासह राज्यातील इतर राजकीय व सामाजिक क्षेत्रात घडणाऱ्या घडामोडींचा आढावा आपण या लाइव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.

Live Updates

Mumbai Breaking News Live Update : महाराष्ट्र व देशातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील घडामोडींचा आढावा एकाच क्लिकवर.

11:36 (IST) 21 Aug 2025

पाऊस थांबला, मात्र महामार्गांवरील कोंडी सुटेना!

पावसाची विश्रांती मिळूनही मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सलग चौथ्या दिवशी वाहतूक कोंडी कायम असल्याचे समोर आले आहे. परिणामी, या कोंडीमुळे प्रवासी हैराण झाले आहेत. …सविस्तर बातमी
11:28 (IST) 21 Aug 2025

महापालिकेच्या परिवहन बसगाड्यांच्या वेळापत्रकाचा गोंधळ; मिरा रोड रेल्वे स्थानकाबाहेर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा

मिरा भाईंदर महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बसगाड्यांचे वेळापत्रक बिघडल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याची बाब समोर आली आहे. …वाचा सविस्तर
11:20 (IST) 21 Aug 2025

इगतपुरीत धो धो…भातशेतांना तलावाचे स्वरुप

इगतपुरी तालुक्याच्या पश्चिम भागात अतिवृष्टीमुळे भातशेतांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पावसामुळे काही ठिकाणी भात रोपे टाकण्यासाठी शेतकऱ्यांना यंदा संधी मिळाली नाही. …वाचा सविस्तर
10:45 (IST) 21 Aug 2025

शीतल नगरच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; अंतर्गत ९ मीटर रस्त्याची रुंदी १२ मीटर करण्यासाठी महापालिकेचा शासनाला प्रस्ताव

मिरा रोड येथील शीतल नगर गृहसंकुलाच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. येथील अंतर्गत ९ मीटर रस्ता हा १२ मीटर करण्यासाठी महापालिकेने शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. …सविस्तर बातमी
10:35 (IST) 21 Aug 2025

बेस्ट पतपेढीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (२१ ऑगस्ट) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, “या भेटीचे वेगळे अर्थ काढण्याची आवश्यकता नाही. राज ठाकरे हे एका पक्षाचे प्रमुख आहेत. तर देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे कोणतीही व्यक्ती मुख्यमंत्र्यांना भेटू शकते”, असं शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.

10:34 (IST) 21 Aug 2025

पावसामुळे गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी अडचणी; बाजारपेठांमध्येही शुकशुकाट

गणेशोत्सवासाठी अवघा एक आठवडा शिल्लक असताना कोसळत असलेल्या पाऊस, निर्माण झालेली पूरस्थिती यामुळे खरेदीसाठी नागरिकांना घराच्या बाहेर ही पडता येत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. …अधिक वाचा
10:19 (IST) 21 Aug 2025

“लढून उपयोग नाही, सिंचन घोटाळ्यातील आरोपीलाच ३०० कोटी देण्याचा आदेश”, अंजली दमानियांची उद्विग्न प्रतिक्रिया

७० हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाने बुधवारी महत्त्वाचा निकाल दिला. बाणगंगा धरणाचे काम एफ. ए. एंटरप्रायजेस ही कंपनी पाहत होती. या कंपनीला उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. तसेच राज्य सरकारला आदेश दिला आहे की त्यांनी या कंत्राटदार कंपनीला ३०३ कोटी रुपयांची भरपाई द्यावी. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया व राज्य सरकार या कंत्राटदार कंपनीविरोधात लढत होतं. मात्र, न्यायालयाच्या आदेशानंतर दमानिया यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

अंजली दमानिया यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये म्हटलं आहे की “लढून काहीच उपयोग नाही असे वाटायला लागले आहे. जीवाची पर्वा न करता, वेड्यासारखे सिंचन घोटाळ्याविरुद्ध लढलो. त्या निसार खत्री नावाच्या कंत्राटदाराला जेलमध्ये पाठवले, आणि आज त्याच व्यक्तीला उरलेले ३०० कोटी देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. लढण्याची टाकद आणि इच्छा दोन्हीही संपत चालली आहे. अतोनात दुःख होतंय. “