Maharashtra Political News: गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना टप्प्या टप्प्याने सुरुवात झाली आहे. यामध्ये सर्वात आधी नगर पंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. त्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरणही सध्या तापलेले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपावरून झालेल्या बेबनावामुळे अनेक ठिकाणी राजकीय पक्ष स्वतंत्रपणे लढत आहेत. याच पार्श्वभूमीवर दिवसभरातील पाच चर्चेतील राजकीय विधानांचा आढावा घेऊया.

“मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार”

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. आज काँग्रेस पक्षाने मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. याची माहिती काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी दिली.

“मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. २२७ जागांवर काँग्रेस पक्ष निवडणूक लढणार आहे. आमच्या पक्षाची जिल्हा काँग्रेस कमिटी, ब्लॉक काँग्रेस कमिटी आणि संपूर्ण पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे की आम्ही स्वबळावर निवडणूक लढवली पाहिजे. त्यामुळे आम्ही महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार आहोत”, असे रमेश चेन्निथला यांनी म्हटले आहे.

“बिहारमधला ऱ्हास पाहूनही…”

मुंबईत आज (१५ नोव्हेंबर) काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेसने मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबतची माहिती दिली.

काँग्रेसच्या या निर्णयावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. महाविकास आघाडीमधील काँग्रेसच्या मित्रपक्षाने म्हणजेच शिवसेनेने (उबाठा) यावर प्रतिक्रिया दिली आहे. “बिहारमध्ये पक्षाचा झालेला ऱ्हास पाहूनही काँग्रेसने असा निर्णय घेतला आहे. हा निर्णय योग्य आहे की अयोग्य हे पुढच्या काही दिवसांत सिद्ध होईल”, असे वक्तव्य शिवसेनेच्या (उबाठा) नेत्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.

‘राहुल गांधी यांच्यासारखीच…’

बिहार विधानसभा निवडणुकीतील यशानंतर सत्ताधारी भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून जल्लोष साजरा होत आहे, तर विरोधी पक्षाकडून आरोपांची मालिका सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना आरोप केले होते.

आमदार रोहित पवार यांनी केलेल्या टिकेला मंत्री प्रताप सरनाईक यांनी उत्तर दिले आहे. सरनाईक यांनी शनिवारी ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी रोहित पवार यांच्यावर टीका केली. “पराभव झाला हे मान्य करा. आमच्या लाडक्या बहिणींना आम्हाला कौल दिला, हे मान्य करा. महाराष्ट्र असो किंवा बिहार असो, येथे महायुतीच्या सरकारने अतिशय चांगले काम केले, हे मान्य करा. किती दिवस असे आरोप-प्रत्यारोप करत राहणार आहात? आरोप केल्यानंतर राहुल गांधींची जी परिस्थिती बिहारमध्ये झाली, तीच परिस्थिती रोहित पवारांची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये होईल”, अशी टीका सरनाईक यांनी केली.

“जो जिता वही सिकंदर, विरोधकांनी पराभव स्वीकारावा”

बिहार विधानसभेच्या निवडणुकीत एनडीएने मोठा विजय मिळवत तब्बल २०२ जागा जिंकल्या आहेत. तर विरोधकांच्या महाआघाडीला फक्त ३५ जागांवरच समाधान मानावे लागले. त्यामुळे बिहारच्या निवडणुकीत महाआघाडीला मोठा धक्का बसला.

दरम्यान, बिहार निवडणुकीच्या निकालावर राजकीय नेते मंडळी प्रतिक्रिया देत आहेत. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. बिहारमध्ये एनडीएच्या एवढ्या जागा जिंकून येण्यामागचे कारण तेथील महिलांना त्यांच्या खात्यात १० हजार रुपये देण्याच्या योजनेचा हा परिणाम असल्याचे शरद पवारांनी म्हटले आहे.

यावर नागपूरमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली. ते म्हणाले, “निवडणुकीत जय-पराजय स्वीकारायचा असतो. जो जिता वही सिकंदर असतो. विरोधकही सत्तेत होते, त्यांनी का नाही अशा योजना आणल्या? आम्ही त्या आणल्या, लोकांना त्या आवडल्या. त्यांनी मतदान दिले. मुंबईत महायुतीचाच महापौर होईल.”

“आम्ही स्वतंत्र लढणार, आमची तयारी पूर्ण”

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीतील जागावाटपावरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काही ठिकाणी तणाव आहे. अशात गेवराईचे राष्ट्रवादीचे (अजित पवार) आमदार विजयसिंह पंडीत यांनी स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा केली आहे.

आमदार विजयसिंह पंडीत म्हणाले, “बीड जिल्ह्याचे पालक मंत्री अजित पवार आहेत. बीड नगरपालिका जिल्ह्यातील सर्वात मोठी नगरपालिका आहे. अजित पवार पालकमंत्री झाल्यापासून बीड शहरातील विकासकामांसाठी ५०० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. बीड नगरपालिकेसाठी आम्ही २२ प्रभाग आणि नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार निश्चित केले आहेत. गेवराईमध्ये घड्याळ चिन्हावर आम्ही स्वतंत्र लढतोय. बीडमध्ये आमचे शिवसेनेशी चर्चा झाली आहे.”