परभणी : जिल्ह्यातल्या ग्रामपंचायत क्षेत्रात एकल महिलांचे सर्वेक्षण नुकतेच पूर्ण झाले असून, या महिलांची संख्या ३४ हजार ७३३ एवढी असल्याचे आढळून आले आहे. आता नगरपंचायत, नगरपालिका, महापालिका सर्वेक्षण सुरू आहे. त्याचीही आकडेवारी लवकरच जाहीर होईल, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
ग्रामपंचायत क्षेत्रात अंगणवाडीसेविकांनी केलेल्या सर्वेक्षणात समाविष्ट ३४ हजार ७३३ महिला आढळल्या असून, त्यांपैकी सुमारे ९३ टक्के महिला विधवा आहेत, तर ६० वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील महिलांचे प्रमाण ५२.२४ टक्क्यांहून अधिक आहे. यापैकी सुमारे ७३.८३ टक्के महिला निरक्षर असून, ५५ टक्क्यांहून अधिक महिला शेतमजुरीवर अवलंबून आहेत.
परिणामी या महिलांना आरोग्य, निवारा, उपजीविका व सामाजिक सुरक्षाविषयक मूलभूत सेवा या संदर्भात उपाययोजनांची गरज आहे. महिला व बालकल्याण विकास राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी राज्यातील एकल महिलांच्या प्रश्नात आपण लक्ष घातल्याचे सांगितले असून, परभणी जिल्ह्यापासून एकल महिलांच्या सर्वेक्षणास अंगणवाडीसेविकांच्या मदतीने सुरुवात केली असल्याची माहिती त्यांनी दिली.
निरक्षर व अल्पशिक्षित महिलांची संख्या मोठी असल्याने त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मर्यादा येऊन पारंपरिक व्यवसाय व आधुनिकीकरण असा दृष्टिकोन घेऊन त्यांचे आर्थिक पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे पालकमंत्री बोर्डीकर यांनी सांगितले. या एकल महिलांमध्ये ६० वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील महिलांचे प्रमाण ५२.२४ टक्क्यांहून अधिक आहे; परंतु अशा महिलांसाठी वृद्धापकाळातील योजना खूपच कमी आहेत. अशा ज्येष्ठ नागरिक महिलांचे आरोग्य, सुरक्षितता, उदरनिर्वाह यासाठी योजनांची गरज आहे.
जमिनीचा मालकी हक्क, राहते घर, उत्पन्नाचे साधन यांचा अभावही मोठ्या प्रमाणावर आढळून आला आहे. त्यामुळे वयोगट, शैक्षणिक स्तर, सामाजिक परिस्थिती व आर्थिक स्थिती यानुसार केंद्रित, लक्षवेधी आणि स्त्री-हितवादी हस्तक्षेप आवश्यक आहेत. या अनुषंगाने शासन, स्थानिक स्वराज्य संस्था व सीएसआर भागीदार यांच्यामार्फत सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या माध्यमातून एकात्मिक धोरणात्मक कृती आराखडा राबवण्याचा जिल्हा प्रशासनाचा विचार आहे. या कृती कार्यक्रमाने सर्वांगीण सक्षमीकरणास चालना मिळून, सामाजिक समावेश व महिला सन्मानाचे उद्दिष्ट या सर्वेक्षणाद्वारे साध्य करता येईल, अशी प्रतिक्रिया या वेळी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली.
एकल महिलांसाठी कृती गट तयार करणार
एकल महिलांसाठी योजना, साक्षरता कार्यक्रम, सहायता केंद्रे, महिला बचत गटांचे सशक्तीकरण, कौशल्यविकास प्रशिक्षण, गृहउद्योग प्रोत्साहन, तसेच आरोग्य व निवारा सुविधा यांचा समावेश असणार आहे. उमेद व मविम यांच्या मदतीने या महिलांचे स्वयंरोजगार उभे करण्याचे विशेष प्रयत्न करण्यात येतील. हे सर्व कार्यक्रम राबवण्यासाठी तालुकास्तरावर व जिल्हास्तरावर अधिकारी व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने कृती गट तयार करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले.