देशात लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यासाठी प्रचाराची धामधूम सुरू आहे. महाराष्ट्रातील पाचही टप्प्यांतील निवडणूक पार पडलेली आहे. आता लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशवासियांचं लक्ष या निकालाकडे आहे. असं असतानाच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी मोठं विधान केलं आहे.

४ जून रोजी लागणाऱ्या निकालानंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी आमच्या पक्षात येणाऱ्यांच्या रांगा लागल्याशिवाय राहणार नाहीत, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. तसंच ४ जूननंतर महाराष्ट्रात चमत्कार घडणार असून महाविकास आघाडी ३५ जागा जिंकेल, असंही ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांनी आपल्या घरासमोर एक बोर्ड लावला आहे. या बोर्डावर महाराष्ट्रात चमत्कार घडणार असं लिहिलं आहे. दरम्यान, टिव्ही ९ मराठीशी बोलताना अनिल देशमुखांनी हे विधान केलं.

हेही वाचा : भारतीय जनता पक्षाच्या जागेवर मनसेने केला उमेदवार जाहीर, आता भाजपाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष!

अनिल देशमुख काय म्हणाले?

“पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात विदर्भात निवडणुका झाल्या. त्यामुळे मी आधी विदर्भात चमत्कार घडेल असा बोर्ड लावला होता. त्यानंतर जेव्हा महाराष्ट्रातील पाचही टप्प्यातील निवडणुका झाल्या. त्यानंतर ज्या पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये दिसत आहे. त्यामध्ये महागाईचा प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न, शेतकऱ्यांचा प्रश्न, कापूस, सोयाबीन, कांदा, संत्रा, असे अनेक प्रश्न होते. त्यामुळे ज्या प्रकारचे वातावरण महाराष्ट्रात होतं. या अनुषंगाने महाराष्ट्रात चमत्कार घडणार, अशा प्रकारची परिस्थिती असल्यामुळे हा बोर्ड लावला आहे. हा चमत्कार आकड्याच्या भाषेत सांगायचं झालं तर ३५ पेक्षा जास्त जागा महाविकास आघाडीच्या येतील”, असं अनिल देशमुख म्हणाले.

४ जूननंतर काय होईल?

“४ जून रोजी जो निकाल येईल, त्यानंतर अनेकजण जे आमच्यापासून दूर गेले होते. ते पुन्हा येण्यासाठी प्रयत्न करू शकतात. मात्र, आमच्या पक्षाने ठरवलं आहे की, जे आम्हाला कठीण काळात सोडून गेले, त्यांना पुन्हा पक्षात घ्यायचं नाही. ४ जूननंतर काय होईल ते पाहा. जसंजशी विधानसभेची निवडणूक जवळ येईल, तशा येणाऱ्यांच्या रांगा लागल्याशिवाय राहणार नाहीत, अशी परिस्थिती आहे. जे आम्हाला सोडून गेले तेही रांगेत असतील”, असं मोठं विधान अनिल देशमुख यांनी केलं.

पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा घेणार का?

जे पक्ष सोडून गेले त्यांना पुन्हा पक्षात घेणार का? असा प्रश्न अनिल देशमुख यांना विचारण्यात आला असता ते म्हणाले, “आमच्या पक्षाचं ठरलं आहे की, जे आम्हाला सोडून गेले त्यांना आमच्या पक्षात घ्यायचं नाही. मग कितीही मोठा नेता असो.” अजित पवार यांनी पु्न्हा येतो म्हटलं तर? या प्रश्नावर अनिल देशमुख म्हणाले, “कितीही मोठा नेता असो, कुणालाही घ्यायचं नाही, असं आमचं ठरलं आहे”, असं ते म्हणाले.