राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अध्यक्ष शरद पवार यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याची घोषणा केली होती. यानंतर शरद पवारांनी अजित पवार गटातील प्रमुख नेत्यांच्या मतदारसंघात सभा घ्यायला सुरुवात केली आहे. शरद पवारांनी सर्वात आधी येवला, त्यानंतर बीड आणि कोल्हापूर येथे सभा घेतल्या आहेत. या सभेच्या माध्यमातून शरद पवार हे अजित पवार गटावर थेट टीकास्र सोडत नसले तरी जनमत एकवटण्याचं काम करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बीड येथील सभेतून शरद पवार यांनी सत्ताधारी भाजपासह अजित पवार गटातील नेत्यांवर टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी आज बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उत्तरसभा होणार आहे. या सभेला प्रचंड गर्दी असेल, असा दावा मंत्री धनंजय मुंडे यांनी केला आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे.

हेही वाचा- “महाराष्ट्राच्या प्रत्येक मंत्रालयात…”, ३७०० कोटींच्या घोटाळ्याचा उल्लेख करत राऊतांचा गंभीर आरोप

“अशा उत्तर सभांना कुणी विचारत नाही. मुख्य सभेला महत्त्व असतं. अजित पवारांची उत्तर सभा म्हणजे स्वत:वर अंत्यसंस्कार आणि उत्तर क्रिया करण्यासारखं आहे, अशा शब्दांत संजय राऊतांनी टीका केली आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊतांनी ही टीका केली.

हेही वाचा- उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का; माजी आमदाराचा शिंदे गटात प्रवेश

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार हे नांदेडहून परभणीला रवाना झाले आहेत. नांदेड येथे त्यांचं स्वागत झाल्यानंतर ते लगेच हेलिकॉप्टरने रवाना झाले. परभणीत ‘शासन आपल्या दारी’ या शासकीय कार्यक्रमाला ते हजेरी लावणार आहेत. त्यानंतर ते दुपारी तीन वाजता बीड येथे उत्तर सभा घेणार आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mp sanjay raut on ajit pawar rally in beed sharad pawar dhananjay munde rmm