राज्यात येत्या काही दिवसांतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे, कारण नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने गेल्या पाच वर्षांपासून रखडलेल्या या निवडणुकांची प्रक्रिया जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक त्यांच्या पक्षासाठी ‘करो या मरो’ची असणार आहे.
“करो या मरो”ची लढाई
मुंबईत इंडिया टुडेच्या कार्यक्रमात बोलताना आदित्य ठाकरे यांनी महायुतीवर जोरदार टीका केली आणि मुंबई महानगरपालिकेची निवडणूक त्यांच्या पक्षासाठी “करो या मरो” ची लढाई असल्याचे म्हटले.
आदित्य ठाकरे यांनी महानगरपालिका निवडणुकांबद्दल बोलताना म्हटले की, “प्रत्येक बीएमसी निवडणूक आमच्यासाठी ‘करो या मरो’ची लढाई म्हणून मांडली जाते. मुंबईकरांना कोणाला मतदान करायचे हे माहित आहे. म्हणूनच मुंबईकरांनी गेल्या २५ वर्षांपासून आमच्यावर विश्वास ठेवला आहे.”
“ही निवडणूक महाराष्ट्राचे, महाराष्ट्रातील लोकांचे आणि मुंबईचे अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींपासून रक्षण करण्याबाबत आहे”, असेही आदित्य ठाकरे यांनी नमूद केले.
शिवसेना-मनसे युती होणार का?
मुंबई महापालिका निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेसोबत युती करणार का? असा प्रश्न विचारल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी कोणतेही वक्तव्य केले नाही. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून मनसे स्थापन केल्यापासून, हिंदी सक्तीविरोधातील आध्यादेश सरकारने मागे घेतल्यानंतर झालेल्या विजयी मेळाव्यात ते आणि उद्धव ठाकरे प्रथमच एकाच व्यासपीठावर आले होते. तेव्हापासून दोन्ही पक्षांमध्ये युती होणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.
ठाकरे ब्रँड विरुद्ध मोदी ब्रँड
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजकीय ब्रँडची ठाकरे ब्रँडशी तुलना करताना आदित्य ठाकरे म्हणाले, “एक ब्रँड मत चोरीला महत्त्व देतो, तर ठाकरे ब्रँड खऱ्या मतांना महत्त्व देतो. मुंबईकरांना माहित आहे की, मुंबईसाठी खरोखर कोण लढत आहे.”
नगरसेवकांचे पक्षांतर
गेल्या काही महिन्यांमध्ये ठाकरे गटातील अनेक माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले की, “जे गेले, ते गेले. त्यांच्याबद्दल विचार करण्याची काहीही गरज नाही.”