राहाता : कोपरगाव विधानसभा निवडणूक काळे व कोल्हे गटाने एकत्रितपणे लढल्याने आ. आशुतोष काळे विधानसभेत निवडून गेले. मात्र यानंतर होऊ घातलेली नगरपालिका निवडणुकीत ही महायुती संपुष्टात आली आहे. प्रदेश भाजपच्या सरचिटणीस तथा निवडणूक प्रभारी माजी आ. स्नेहलता कोल्हे, युवानेते विवेक कोल्हे यांनी कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत स्थानिक आघाडी उभी केली आहे.
भाजप मित्रपक्ष अर्थात कोल्हे गटाकडून भाजप व मित्रपक्षांच्या वतीने नगराध्यक्षासह प्रभागाचे उमेदवार जाहीर करण्यात आले. नगराध्यक्षपदासाठी भाजपचे पराग संधान यांना माजी आ. स्नेहलता कोल्हे व युवा नेते विवेक कोल्हे यांच्या साक्षीने उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्याबरोबर १५ प्रभागांतील उमेदवारांची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे. या घडामोडींमुळे नगरपालिका निवडणुकीत महायुतीत बिघाडी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) आमदार आशुतोष काळे यांना काळे आणि कोल्हे दोन्ही गटांनी मिळून निवडून दिले होते. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून भाजपच्या प्रदेश सरचिटणीस स्नेहलता कोल्हे, युवानेते विवेक कोल्हे आणि आ. काळे हे दोन्ही गट एकत्र आले होते.
नगरपालिकेच्या निवडणुकीची उमेदवारी अर्ज भरण्याची सध्या रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीसाठी भाजपने उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यासाठी प्रदेश भाजपच्या सरचिटणीस स्नेहलता कोल्हे यांची निवडणूक प्रभारी म्हणून नेमणूक केली आहे. कोल्हे गटाने कोपरगाव नगरपालिका निवडणुकीत आ. आशुतोष काळे (राष्ट्रवादी) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर युती न करता लोकसेवा आघाडी स्थापन केली आहे. यासाठी कोल्हे गटाकडून नगराध्यक्ष आणि १५ प्रभागांतील उमेदवारांची यादी देखील जाहीर करून आ. काळे गटाला धक्का दिला आहे. संधान यांच्या नावाची घोषणा होताच उपस्थितांनी जल्लोष केला. यावेळी कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
कोल्हे गटाचे उमेदवार निश्चित केल्याने आता आ. आशुतोष काळे यांच्या गटाचे नगराध्यक्षासह इतर प्रभागनिहाय कोण उमेदवार असतील याकडे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीकडून नगरपालिकेच्या निवडणुकीत अद्याप भूमिका स्पष्ट झालेली नाही.
नगरपालिका निवडणुकीत इच्छुकांची संख्या जास्त आहे. जनमाणसातील अंदाज घेऊन उमेदवार निवडण्याचे काम निवड कमिटीने केले. त्यामुळे या निवडणुकीत आपली बाजू भक्कम आहे. माजी आ. स्नेहलता कोल्हे भाजप निवडणूक प्रभारी
भाजप, आरपीआय व मित्र पक्ष लोकसेवा आघाडीकडून एकमत झालेल्या १५ प्रभागांतील ३० उमेदवारांपैकी १९ उमेदवार व नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. प्रभाग क्रमांक ११, १२, १४ या प्रभागातील उमेदवार अद्याप निश्चित न झाल्याने ते जाहीर करण्यात आले नाहीत. उर्वरित प्रभागातील उमेदवारांसंदर्भात काही चर्चा व वाटाघाटी सुरू असून उद्या इतर उमेदवार जाहीर होतील. विवेक कोल्हे
