Lok Sabha Session 2024 : १८ व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन सोमवारपासून सुरू झालं आहे. आज (२५ जून) अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. या अधिवेशनाचं कामकाज पुढील १० दिवस चालणार आहे. लोकसभेचे हंगामी अध्यक्ष भर्तृहरी महताब हे नवनिर्वाचित खासदारांना शपथ देत आहेत. खासदारकीची शपथ देत असताना हिंगोलीचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी खासदारीची शपथ घेताना बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख केला. त्यामुळे यावर लोकसभा अध्यक्षांनी आक्षेप घेत नागेश पाटील आष्टीकर यांना थांबवल. त्यानंतर आष्टीकरांना पुन्हा शपथ घ्यावी लागली.

संसदेत नवनिर्वाचित खासदारांना शपथ देण्यात येत आहे. यामध्ये हिंगोलीचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी संसेदत मराठीमध्ये शपथ घेतली. मात्र, खासदारकीची शपथ घेत असताना त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या वडिलांचं स्मरण केलं. यावर लगेच लोकसभेचे हंगामी अध्यक्ष भर्तृहरी महताब यांनी त्यांना थांबवलं. तसेच खासदारीकीची शपथ घेताना जे लिहिलेलं आहे त्यानुसार शपथ घ्यावी, असं सूचवलं. त्यानंतर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी पुन्हा खासदारकीची शपथ घेतली.

हेही वाचा : Parliament Session : मराठी नव्हे इंग्रजीत… निलेश लंकेंचा संसदेत पहिला शपथविधी, शेवटी म्हणाले…

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत नागेश पाटील आष्टीकर यांनी शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवली. त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे बाबुराव कदम होते. या निवडणुकीत नागेश पाटील आष्टीकर यांनी शिंदे गटाचे बाबुराव कदम यांचा मोठ्या मताधिक्यांनी पराभव केला होता.

निलेश लंकेंनी घेतली इंग्रजी शपथ

केंद्रात एनडीएचं सरकार स्थापन झाल्यानंतर आता संसदेचं अधिवशेन सुरु आहे. या अधिवेशनामध्ये खासदारांचे शपथविधी चालू आहेत. या दरम्यान, महाराष्ट्रातील काही खासदारांनी शपथ घेतली आहे. यामध्ये काही खासदारांनी मराठी भाषेतून शपथ घेतली. तर काही खासदारांनी हिंदी आणि काही खासदारांनी इंग्रजी भाषेतून शपथ घेतली.

यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी इंग्रजी भाषेत शपथ घेतली आहे. निलेश लंके यांनी इंग्रजीतून शपथ घेतल्यानंतर त्यांचं कौतुक होऊ लागलं आहे. तसेच निलेश लंके यांची ही शपथ त्यांचे मतदारसंघातील विरोधक सुजय विखे पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर असल्याचं बोललं जात आहे.