नांदेड : मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनातून ‘कुणबी मराठा’च्या नोंदी शोधून काढण्यासाठी हैदराबाद गॅझेटिअरचा आधार घेण्याचे शासनाने मान्य केले. तसेच त्यासंबंधीचा आदेश जारी केल्यानंतर याच गॅझेटिअरचा संदर्भ देत मराठवाड्यातील बंजारा (लमाण) समाजाने आम्हाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी पुढे आणली आहे. या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यात हा समाज संघटित होताना दिसत आहे.
मुखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. तुषार राठोड यांनी या मागणीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी मुंबईमध्ये भेट घेऊन बंजारा समाजाच्या या मागणीसंदर्भात निवेदन सादर केले. हैदराबाद गॅझेटिअरमध्ये बंजारा समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करण्यात आला होता. पण महाराष्ट्रात या समाजाला ओबीसी, एनटीसी प्रवर्गात समाविष्ट केले गेले. मराठा आंदोलनाच्या निमित्ताने शासनाने हैदराबाद गॅझेटिअर स्वीकारले असल्याच्या पार्श्वभूमीवर बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करून या प्रवर्गाच्या आरक्षणाचा लाभ देण्याची मागणी राठोड यांनी केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या पत्रावर सुस्पष्ट शेरा मारला आहे. याबाबतची वस्तुस्थिती सादर करावी, असे त्यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना कळविले. दरम्यान, बंजारा समाजातील धर्मप्रचारक बंडू महाराज दापकेकर यांनीही आपल्या समाजाचा समावेश एसटी प्रवर्गात करण्याची मागणी बुधवारी येथे केली. देगलूर येथे प्राचार्य शंकरराव राठोड यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने याच मागणीचे निवेदन स्थानिक प्रशासनाकडे सादर केले.
उपोषणाचा इशारा
हिंगोली येथील प्रा.डी.आर.पवार मागील अनेक वर्षांपासून या मागणीचा पाठपुरावा करत आहेत. भाषावार प्रांतरचनेमुळे मराठवाड्यातील बंजारा समाजावर अन्याय झाला. हैदराबाद राज्यात हा समाज अनुसूचित जमातीत होता. याकडे लक्ष वेधून समाजाच्या न्याय्य मागणीसाठी येत्या १७ सप्टेंबरपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा प्रा.पवार यांनी दिला आहे.