लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्य्यातील मतदान आज पार पडले. सातव्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. महाराष्ट्रातील पाचही टप्प्यातील मतदान झालेलं आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. मात्र, लोकसभा निवडणूक संपत नाही तोच राजकीय पक्ष महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची २७ मे रोजी मुंबईत महत्वाची बैठक बोलावण्यात आली असल्याची माहिती खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात लवकरच मोठं इनकमिंग होणार असल्याचं सूचक विधानंही त्यांनी केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुनील तटकरे काय म्हणाले?

“राज्यभरात लोकसभेचं मतदान झालं. लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रीय प्रश्न आणि राष्ट्रीय भूमिका मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला. देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक होती, अशा प्रकारे आम्ही या निवडणुकीला सामोरे गेलो. विरोधकांनी अगदी गल्लीबोळातील प्रश्नांवर भर दिला. निवडणुकीच्या प्रचारात विरोधकांकडून ज्या प्रकारे भाषा वापरण्यात आली ही भाषा महाराष्ट्राच्या संस्कृतीला छेद देणारी होती. असं असलं तरी महायुतीला राज्यात निश्चतच चांगलं यश मिळेल. लढती चुरसीच्या होतील पण अंतिम विजय महायुतीचा होईल”, असं मत सुनील तटकरे यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : ‘इंडी आघाडी मतांसाठी मुजरा करते’, मोदींचं विधान; काँग्रेस नेते म्हणाले, “त्यांच्या डोक्यावर..”

“राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची परवा महत्वाची बैठक मुंबईत बोलावली आहे. या बैठकीला पक्षाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित असणार आहेत. आमची आढावा बैठक जरी असली तरी आम्ही स्पष्टपणे धोरण ठरवलेलं आहे. आता एकच लक्ष्य विधानसभा क्षेत्र, हे सूत्र आम्ही राबवणार आहोत. या माध्यमातून पुन्हा एकदा संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने पावलं उचण्यात येतील. १० तारखेला वर्धापन दिन आहे. हा वर्धापन दिन मुंबई आणि दिल्लीत साजरा करण्याचं नियोजन आहे. त्या बैठकीला सर्व नेते उपस्थित राहतील. तसेच महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरच्या अनेक सहकार्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश होईल. हा पक्षप्रवेश राज्याच्या, देशाच्या आणि पक्षाच्या राजकारणाला कलाटणी देणारा असेल”, असं सुनील तटकरे यांनी यावेळी सांगितलं.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात होणाऱ्या पक्ष प्रवेशाबाबत बोलताना सुनील तटकरे म्हणाले, “अनेकांचा संपर्क वेगवेगळ्या स्थरावर आहे. संघटनात्मक स्थरावरही संपर्क आहे. काहींशी माझा संपर्क तर काही अजित पवार यांच्या संपर्कात आहेत. काहीजण प्रफुल्ल पटेल यांच्याही संपर्कात असू शकतात. त्यामुळे सर्वकाही चित्र २७ तारखेला स्पष्ट होईल”, असं मोठं विधान सुनील तटकरे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp ajit pawar group mp sunil tatkare big statement to some leaders will join the party in ncp gkt