राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर बारामती लोकसभेच्या निवडणुकीची चर्चा देशभरात झाली. बारामतीच्या राजकारणात शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडलेले आहेत. दोन गट पडल्यामुळे पवार कुटुंबात दुफळी निर्माण झाल्याची चर्चा आहे. यामध्ये काहीजण अजित पवारांबरोबर तर काहीजण शरद पवारांच्या बरोबर आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्याबाबत बोलताना आम्ही कुटुंब म्हणून एक आहोत, असं म्हटलं होतं. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मोठं विधान केलं आहे. “अजित पवार यांचं कुटुंब आता वेगळं आहे”, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.

रोहित पवार काय म्हणाले?

“केंद्रात आणि राज्यात युतीचं सरकार असताना शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांना संधी दिली नाही. पण प्रफुल्ल पटेल यांना संधी दिली. मी जिल्हा परिषद सदस्य असताना दुसरं कोणतंही पद माझ्याकडे नव्हतं. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना इतर लोकांच्या जवळच्या नेत्यांना संधी दिली गेली. पण मला तेथे पद नव्हतं. मात्र, आम्हीही कधी त्याबाबत तक्रार केली नाही. कारण आमची सुरुवात होती. त्यानंतर आम्ही संघर्ष करत आहोत”, असं रोहित पवारांनी म्हटलं.

हेही वाचा : “…तर एलॉन मस्कला निवडणूक अधिकारी वंदना सुर्यवंशींकडे शिकवणी लावावी लागेल”, राऊतांचा टोला

सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची खासदारकी देण्यात आली. यावर बोलताना रोहित पवारांनी म्हटलं की, “अजित पवारांनी तो निर्णय का घेतला? राजकीय दृष्टीकोणातून तो चुकीचा दिसत असला तरी त्यांच्या पक्षामधील काही आमदार आणि नेते कुठेतरी काहीतरी कुजबुज करत असतील. कारण त्यांचा कोणावरच विश्वास नसल्यामुळे त्यांनी घरच्या व्यक्तीला ते पद देण्याचा निर्णय घेतला असेल. कारण अजित पवारांचा कोणावरही विश्वास नसेल. आता अजित पवारांचं कुटुंब वेगळं आहे आणि शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखालील कुटुंब वेगळं आहे”, असं रोहित पवारांनी स्पष्ट केलं आहे.

रोहित पवार घराणेशाहीवर काय म्हणाले?

बारामतीमध्ये पवार कुटुंबात तीन खासदार आहेत. तसेत दोन आमदार आहेत. त्यामुळे पवार कुटुंबावर घराणेशाहीची टीका होत आहे, या प्रश्नावर बोलताना रोहित पवार म्हणाले, “आता टीका करणारे लोक कोण आहेत? टीका करणारी व्यक्ती फक्त नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस आहेत. नरेंद्र मोदी एका बाजूला घराणेशाहीवर टीका करतात आणि दुसरीकडे अनेक कुटुंबांना फोडून नेते स्वत:कडे घेत आहेत. यामध्ये विखे पाटील कुटुंब, पवार कुटुंब, मुंडे कुटुंब असे अनेक कुटुंब आपल्याला दिसतील. सर्वात जास्त घराणेशाही नेते कोणाकडे असतील तर ते भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत. घराणेशाहीचा विषय तेच काढतात आणि नेत्यांनाही तेच घेतात. त्यांच्या पक्षात मोठ्या प्रमाणात घराणेशाही आहे”, अशी टीका रोहित पवारांनी भाजपावर केली.