अहिल्यानगर : नेवासा तालुक्यात आठवडाभराच्या अंतराने दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. बाबासाहेब सुभाष सरोदे (वय ४४) व नानासाहेब केशव ठोंबळ (वय ४९) अशी या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली आहे.
वडुले येथील अल्पभूधारक शेतकरी बाबासाहेब सुभाष सरोदे यांनी १७ ऑगस्ट रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी मोबाईलमध्ये चित्रफीत तयार करून थेट राज्य सरकारला जबाबदार धरले आहे. दोनदा सरकार आले पण खरी कर्जमाफी नाही, आमच्यासाठी बजेट नाही, आमच्या जीवाला किंमत नाही, अशा शब्दात त्यांनी चित्रफीतीमधून सरकारवर रोष व्यक्त केला. जिवंत माणसाला मदत नाही, मेल्यावर तरी कुटुंबाला मदत करा, असेही त्यांनी चित्रफितीत नमूद केले आहे.
त्यानंतर काल, शुक्रवारी गोयगव्हाण येथील शेतकरी नानासाहेब केशव ठोंबळ यांनी विष प्राशन करून आपले जीवन संपवले. ठोंबळ हे मेहनती शेतकरी म्हणून ओळखले जात होते. मात्र, नैसर्गिक संकट व शेतीच्या वाढत्या खर्चाने त्यांचे आर्थिक गणित बिघडले होते. ठोंबळ यांच्या अंत्यविधीसाठी कुटुंबीयांकडे पैसे नसल्यामुळे ग्रामस्थांनी वर्गणी काढून अंत्यसंस्कार केले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी व वृद्ध आई असा परिवार आहे. प्रहार युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग औताडे यांनी या दोन्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या नसून, सरकारच्या चुकीच्या धोरणांचे बळी आहेत, असा आरोप केला आहे. दोन शेतकऱ्यांच्या मृत्यूमुळे नेवासा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.