सांगली : ओबीसी समाज बांधवांच्या वतीने ओबीसी आरक्षणास बाधा आणणाऱ्या व अन्यायकारक निर्णयाविरोधात बुधवारी इस्लामपूर तहसील कार्यालयावर ओबीसी समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. मोर्चाच्या वतीने मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास विरोध दर्शवण्यात आला.
वाळवा पंचायत समितीपासून बस स्थानक, लाल चौक, गांधी चौकमार्गे काढण्यात आलेला ओबीसी समाज आरक्षण हक्क मोर्चाची सांगता तहसील कचेरीजवळ करण्यात आली. या मोर्चात तालुक्याच्या प्रत्येक गावातून ओबीसी समाज बांधव, महिला, युवक सहभागी झाले होते.
मराठा समाजासाठी वेगळे आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. मात्र, १ सप्टेंबर रोजी शासनाने काढलेला अध्यादेश ओबीसी समाजावर अन्यायकारक असून, तो असंविधानिक असल्याने ओबीसींच्या हक्कावर परिणाम करणारा आहे. राज्यातील सुमारे ३५०हून अधिक जातींना मिळणारे सामाजिक आरक्षण हे चुकीच्या पद्धतीने समावेश केलेल्या लोकांना दिले गेले, तर मुळातच सामाजिक मागास असलेल्या ओबीसी समाजाचे शिक्षण व राजकीय क्षेत्रामध्ये प्रतिनिधित्व कमी होईल, तसेच नोकरीच्या मध्ये मिळणाऱ्या संधीमध्ये मोठी घट होईल.
तसे झाले तर प्रस्थापित समूहाला याचा फायदा होईल आणि मागास बहुजन ओबीसी समाज पुन्हा वंचितच राहील. हे आरक्षण धोरणाच्या विरोधी आहे व मानवतेच्या दृष्टीने योग्य नाही. आधीच मर्यादित संधी असताना या निर्णयामुळे संधी गमवावी लागेल व समाज आणखी मागे जाईल. म्हणून ओबीसी आरक्षणामध्ये इतर कोणत्याही समाजाचा समावेश होऊ नये, ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व, हक्क आणि आरक्षण संरक्षित राहावे यासाठी शासनाने ठोस स्वरूपाचे धोरण जाहीर करावे, या प्रमुख मागणीसाठी सदरच्या ओबीसी आरक्षण हक्क मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
मोर्चाच्या वतीने तहसीलदार यांना समाजातील ऋतुजा सर्जेराव माळी, सानिका दत्तात्रय फल्ले, तमन्ना अबिद नायकवडी, मृणाली माणिक गुरव, सिद्धी अमोल चव्हाण या ओबीसी समाजातील मुलींच्या हस्ते तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या मोर्चाचे नेतृत्वही समाजातील मुलींनीच केले.
मुलींच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चामध्ये महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. राजेंद्र ऊर्फ चिमण डांगे, प्रदेश नेते नंदकुमार कुंभार, जगन्नाथ माळी, संभाजी कचरे, भानुदास विरकर, अजित भांबुरे, सागर मलगुंडे, विश्वनाथ डांगे, शकील सय्यद, प्रदीप लोहार, शिवाजी वाटेगांवकर, अविनाश खरात, शंकर चव्हाण, मोहन भिंगार्डे, लक्ष्मण मदने, पांडुरंग सुतार, हिनायतुल्ला इबुशे, डी. वाय. तांदळे, प्रकाश कनप, राजेंद्र गावडे आदींसह शेकडो जण सहभागी झाले होते.