उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सत्तास्थापनेवर चर्चा केली. त्यानंतर हे दोन्ही नेते आज मुख्यमंत्री आणि मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी पक्षाच्या सर्वच आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पक्षाच्या पुढील वाटचालीवर चर्चा करण्यात असून बैठकीनंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी विरोधी पक्षनेता कोणत्या पक्षाचा होणार यावर भाष्य केलं आहे. विरोधी पक्षनेता हा राष्ट्रवादी काँग्रेसचा होऊ शकतो, असे रोहित पवार म्हणाले आहेत.
रोहित पवार म्हणाले की, “आज आम्ही शरद पवार यांना भेटलो. ते सातत्याने एकच सांगतात की, राजकारणात चढउतार असतात. जेव्हा अडचण येत असते, तेव्हा आपल्या मतदारसंघातील लोकच आपल्यासोबत शेवटपर्यंत राहतात. काही लोक वेवगेवेळ्या आमिषापोटी काही निर्णय घेत असतात. मात्र लोकांना विश्वासात घेऊन मतदारसंघात जाऊन लोकांच्या अडचणी जमसून घ्या. या आडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करा, असे शरद पवार यांनी सांगितलेलं आहे.”
तसेच, “तुम्ही आजही बाहेर जाऊन जनतेला विचारा. जे राजकीय नाट्य झालं ते सामान्य जनतेला पटलेलं नाही. जे झालं ते योग्य झालं नाही. ही आपली संस्कृती नाही. अशा प्रकारे घटना पुन्हा घडू नये त्यासाठी आम्हाला काळजी घ्यावी लागेल. २०२४ च्या निवडणुकीत जनता आम्हालाच कौल मिळेल,” असे रोहित पवार म्हणाले.
हेही वाचा >>> “…तर उद्धव ठाकरेंना समर्थन करणाऱ्या त्या १६ आमदारांची आमदारकी धोक्यात येईल”; बंडखोर आमदारांकडून इशारा
“या बैठकीत विरोधी पक्षनेत्याच्या नावावर चर्चा झाली नाही. पण सध्या राष्ट्रवादी हा मोठा पक्ष दिसतोय. त्यामुळे आकडे बघता विरोधी पक्षनेता हा राष्ट्रवादीचाच असू शकतो,” असे भाकित रोहित पवार यांनी वर्तविले.