परभणी : तालुक्यातील धर्मापुरी येथील ग्रामीण मार्ग क्रमांक ५४ या रस्त्याचे काम न करताच संबंधित ठेकेदाराने अधिकाऱ्यांच्या संगनमतासह संपूर्ण निधी उचलल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अंदाजपत्रकाप्रमाणे काम करून देण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी परभणी-जिंतूर राष्ट्रीय महामार्ग अडवून धर्मापुरी येथे सोमवारी रस्ता रोको आंदोलन केले. असाच प्रकार यापूर्वी तालुक्यातील पेडगाव येथे उघडकीस आला. विशेष म्हणजे जिल्हा परिषद प्रशासनाने याबाबतीत संबंधितांवर अजूनही कोणतीच कारवाई केली नाही.

जिल्हा नियोजन समितीच्या एसआरएफ योजनेंतर्गत धर्मापुरी ग्रामीण रस्ता क्रमांक ५४ चे काम करण्यासाठी ४० लाख रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला. मात्र, संबंधितांनी काम न करता संपूर्ण निधी उचलला. या विषयी ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासन आणि संबंधितांना वेळोवेळी निवेदन देऊन जाब विचारला; मात्र कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने संतप्त ग्रामस्थांनी आज सोमवारी परभणी – जिंतूर राष्ट्रीय महामार्ग धर्मापुरी परिसरात रोखून धरत आंदोलन केले. ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर संबंधित रस्त्याचे काम सुरू करण्याच्या हालचाली अधिकाऱ्यांनी सुरू केल्या; मात्र आधी अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली.

या वेळी संतोष देशमुख, तानाजी कदम, नवनाथ पैठणे, गोविंद कदम, बाळासाहेब देशमुख, हृषीकेश बेटकर, गोपाल कदम, वैजनाथ कदम, नागनाथ कदम, सुरेश काळे, रामराव कदम, रवी डोंगरे, मंगेश तिडके, बाळासाहेब रेंगे, पांडुरंग तिडके यांच्यासह धर्मापुरी व परिसरातील गावांतील शेतकरी व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने आंदोलनस्थळी उपस्थिती होती. या आंदोलनामुळे परभणी-जिंतूर राष्ट्रीय महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

पंधरा दिवसांपूर्वी असाच एक प्रकार उघडकीस आला होता. तालुक्यातील पेडगाव फाट्यापासून पेडगाव रेल्वे स्टेशनमार्गे जांबपर्यंत जाणाऱ्या चार किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम खात्याने तब्बल ५ कोटी ५५ हजार रुपये खर्च करून रस्ते काम पूर्ण केले. आश्चर्याचा भाग म्हणजे जिल्हा परिषद बांधकाम विभागातील अभियंते आणि ठेकेदाराने त्याच रस्त्याचे काम परत दाखवले आणि ४५ लाख ७९ हजार रुपयांची रक्कम अक्षरशः गिळंकृत केली. आश्चर्याचा भाग असा, की ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याप्रकरणी आंदोलनाचा इशारा दिला. पंधरा दिवसांपूर्वी हे आंदोलन होणार होते.

मात्र, जिल्हा परिषदेच्या यंत्रणेने रस्ता दुरुस्तीचे काम करण्याचा शब्द दिला आणि हे आंदोलन स्थगित झाले. त्यानंतर जिल्हा परिषदेने या रस्त्याच्या कामाचे उद्घाटनही केले. कोणतेच काम न करता संपूर्ण रस्त्याच्या कामाचा निधी हडप करण्याचे प्रकार उघडकीस येत असून, लागोपाठ असे दोन प्रकार उघडकीस येऊनही अद्याप प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. या संदर्भात प्रतिक्रियेसाठी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.