केंद्रातल्या मोदी सरकारविरोधात देशभरातले विरोधी पक्ष एकवटले आहेत. महाराष्ट्रातही भाजपाप्रणित एनडीएविरोधात महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. अशातच वंचित बहुजन आघाडी हा पक्ष महाविकास आघाडीत सहभागी होण्यास इच्छूक आहे. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर गेल्या अनेक महिन्यांपासून या आघाडीसाठी प्रयत्न करत आहेत. मविआमधील शिवसेना (ठाकरे गट) या पक्षाबरोबर वंचितची आधीपासूनच युती आहे. आता केवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून हिरवा कंदील येणं बाकी आहे. पंरतु, या दोन्ही पक्षांकडून अद्याप याबाबत कुठलीच कार्यवाही झाल्याचं दिसत नाही. त्यामुळे वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे मविआवर संतापले आहे. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी मविआला इशारा दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वंचितच्या एका सभेत भाषण करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, महाविकास आघाडीचं सरकार जाऊन आता दोन वर्षे उलटली आहेत. अद्याप या तिन्ही पक्षांचं (काँग्रेस, शिवसेना उबाठा, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस) जागावाटपावर एकमत झालेलं नाही. दोन वर्षांमध्ये यांना आपसांत अवघ्या ४८ जागा वाटून घेता आलेल्या नाहीत. त्यमुळे मला राहून राहून अशी शंका येतेय की, यांना खरंच नरेंद्र मोदी यांना हरवायचं आहे का? यांना आगामी निवडणुकीत भाजपाला पराभूत करायचं आहे का?

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, महाविकास आघाडीतले लोक म्हणत आहेत की, वंचित बहुजन आघाडीला लोकसभेच्या दोन जागा देऊ. मग मी काँग्रेसला विचारलं की, कोणत्या दोन जागा तुम्ही आम्हाला देणार? त्यावर ते म्हणाले, ‘प्रकाशराव आमचंच अद्याप वाटप झालेलं नाही. त्यामुळे तुम्हाला कुठून दोन जागा देणार’. त्यामुळे मला तर आता वाटतंय की, यांना युती करायची नाही म्हणून कोणाला तरी बळीचा बकरा बनवू पाहत आहेत. त्यामुळे मी मविआला एवढंच सांगेन की, आधी तुम्ही तुमच्या जागा वाटून घ्या.

प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीला उद्देशून म्हणाले, तुम्ही आम्हाला चर्चेत घेतलं तर आम्ही तुमच्याबरोबर आहोत. परंतु, तुम्ही जसं इथल्या गरीब मराठ्यांना आतापर्यंत वापरत आलेले आहात त्याच पद्धतीने वंचितला वापरण्याचा विचार केला तर मोदींबरोबर आम्ही तुम्हालाही गाडू एवढं लक्षात ठेवा.

हे ही वाचा >> महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकरांचा सहभाग पक्का; लोकसभेच्या ३६ जागांवर आघाडीत एकमत, शरद पवारांची माहिती

…तर काँग्रेस नेते तुरुंगात जातील : आंबेडकर

प्रकाश आंबेडकर शुक्रवारी (२० जानेवारी) अमरावती येथे पार पडलेल्या वंचितच्या सभेत म्हणाले होते, वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीबरोबर युती करण्यास तयार आहे, परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घाबरून काँग्रेसने वंचित आघाडीला दूर ठेवलं आहे. वंचितला सोबत न घेतल्यास तुमची सत्ता येणार नाही आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधींपासून इतर अनेक काँग्रेस नेते तुरुंगात दिसतील, महाविकास आघाडीबरोबर युती झाली नाही, तर वंचित बहुजन आघाडी लोकसभेच्या सर्व ४८ जागा लढवेल.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash ambedkar warns maha vikas aghadi dont try to use vanchit bahujan aghadi asc