Raj Thackeray X Post To MNS Workers: शालेय शिक्षणात पहिलीपासून हिंदीसक्ती प्रकरण, त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर याविरोधातील संयुक्त मोर्चाचे नियोजन, मनसेच्या कार्यकर्त्यांनी परप्रांतीय व्यापाराला केलेली मारहाण आणि सरकारने हिंदीसक्ती मागे घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याबरोबरचा विजयी मेळावा, यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे यांची देशभरात चर्चा होत आहे.

अशात आता राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्ते आणि प्रवक्त्यांना कोणत्याही प्रकरणावर त्यांच्या परवानगीशिवाय माध्यमांशी आणि सोशल मीडियावर व्यक्त व्हायचे नाही, असे आदेश दिले आहेत.

काही मिनिटांपूर्वी ‘एक्स’वर केलेल्या या पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, “एक स्पष्ट आदेश… पक्षातील कोणीही वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही. तसंच स्वतःच्या प्रतिक्रियांचे व्हिडीओही सोशल मीडियावर अजिबात टाकायचे नाहीत.”

राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, “माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे, त्यांनी देखील मला विचारल्याशिवाय, माझी परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाही आणि सोशल मीडियावर व्यक्त व्हायचं नाही.”

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तब्बल २० वर्षांनी ‘मराठीसाठी…’ या विजयी मेळाव्यात एकाच व्यासपीठावर आल्यानंतर मनसे आणि शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) युतीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना युतीबाबत कोणत्याही प्रतिक्रिया देऊ नयेत, असे आदेश दोन दिवसांपूर्वी दिले होते.

याचबरोबर भाजपाचे झारखंडमधील खासदार निशिकांत दुबे गेल्या दोन दिवसांपासून मराठी-हिंदी वादावरून राज ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. दुबे यांनी काल म्हटले होते की, “छत्रपती शिवाजी महाराज, पेशवे, टिळक, सावरकर, आंबेडकर, महात्मा फुले यांच्या महाराष्ट्रातील मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काय करत आहेत, व्हिडिओ पाहा आणि त्यानंतर मी काय म्हणतोय त्यावर विश्वास ठेवा.”

खासदार निशिकांत दुबे यांनी आजही राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये ते म्हणाले की, “ही २००७ मधील विकिलिक्सची नोंद आहे. जेव्हा राज ठाकरे यांना जनतेचा पाठिंबा मिळत नाही, तेव्हा ते गुंडांना पुढे करतात, म्हणजेच गुंडगिरी हा त्यांचा एकमेव हेतू असतो, जो ते आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी पराभवाच्या भीतीने करत आहेत. त्यामुळे मी ठाकरेंच्या गुंडगिरीला विरोध करतो. आता सहनशीलतेच्या मर्यादा ओलांडल्या आहेत.”