राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी मनसे अध्यक्षराज ठाकरे यांच्याबाबत केलेलं विधान सध्या चर्चेत आलं आहे. छगन भुजबळांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये राज ठाकरेंबाबतच्या प्रश्नावर दिलेल्या उत्तरामुळे मनसेकडून संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. एकीकडे छगन भुजबळांचा दावा खोडून काढताना मनसेकडून उलट त्यांच्यावरच गंभीर आरोप करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर लोकसभेसाठी एकमेकांसोबत असणारे दोन मित्रपक्ष निवडणुकांनंतर आमने-सामने आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

काय म्हणाले होते छगन भुजबळ?

छगन भुजबळांनी टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मनसे व राज ठाकरेंबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख केला. “राज ठाकरे शाळेतून लवकर आले नाहीत तर बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेब ‘राजा अजून कसा आला नाही’ असं म्हणत जेवत नव्हते. तुमचं रक्ताचं नातं आहे. मंडल आयोग वगैरे गोष्टींवरून आमचे तर मतभेद झाले. पण तुमचं काय? तुमचे मतभेद का झाले?”, असा प्रश्न छगन भुजबळांनी थेट राज ठाकरेंना केला आहे.

“छगन भुजबळ यांचं मानसिक संतुलन बिघडलं”, राज ठाकरेंवरील टीकेनंतर मनसेचा पलटवार

“राज ठाकरेंनी शिवसेना सोडून चूक केली”

“तुमचे मतभेद झाले तरी तुम्ही हे लक्षात घ्यायला हवं होतं की शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंचीच आहे. मग तुम्ही बाजूला पडण्याचं कारण काय होतं? काय मागणी होती तुमची? सांगा ना लोकांना. मतभेद जरी असले, तरी ते संभाळून घ्यायला नको? बाळासाहेब ठाकरेंना किती दु:ख झालं असेल. ज्याला मी लहानपणापासून सांभाळलं, त्यानं असं करावं? शिवसेना सोडून त्यांनी चूक केली. बाळासाहेबांनी दुसरं एखादं काम दिलं असतं तर ऐकायचं होतं”, असं विधान छगन भुजबळांनी केलं आहे.

मनसेचा छगन भुजबळांवर हल्लाबोल!

दरम्यान, छगन भुजबळांनी केलेल्या विधानावर मनसेकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी तर यावरून थेट भुजभळांना इशाराच दिला आहे. “राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तेव्हा त्यांचं पहिलं वाक्य होतं की माझा वाद विठ्ठलाबरोबर नसून आजूबाजूच्या बडव्यांबरोबर आहे. त्यामुळे त्यांनी शिवसेना का सोडली हे स्पष्ट आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या आजूबाजूला असणाऱ्या बडव्यांनी राज ठाकरेंच्या विरोधात षडयंत्र रचलं ते भुजबळांना माहिती नाही का?” असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला आहे.

“भाजपाचा अजिंक्यपणा फोल, लोकसभा अंतिम नाही, ही लढाई…”; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, विधानसभेचं गणितही सांगितलं

“छगन भुजबळ हे स्वत: राज ठाकरे शिवसेनेत होते तेव्हा त्यांच्याविरोधातील षडयंत्राचा व्यापक भाग होते. भुजबळ कदाचित हे विसरले असतील. त्यामुळे राज ठाकरेंनी शिवसेना का सोडली या गोष्टी छगन भुजबळांनी बोलू नयेत. आम्ही जर त्या वेळी काय घडलं हे सगळं सांगितलं, तर भुजबळ अडचणीत येतील”, असं संदीप देशपांडे म्हणाले.

दरम्यान, यावेळी मनसे व उद्धव ठाकरे गट पुन्हा एकत्र येणार का? असा प्रश्न केला असता संदीप देशपांडे यांनी ती शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली.