सांगली : सांगली महापालिकेचा आगामी महापौर हा महायुतीचाच असेल, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी सांगलीत झालेल्या पत्रकार बैठकीत व्यक्त केला. आमदार चव्हाण हे सांगली दौऱ्यावर आले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या वेळी ते म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाच्या धोरणावर विश्वास ठेवून जे कोणी भाजप प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त करतात, त्यांना पक्षात प्रवेश दिला जाईल. सध्या भाजपची संघटन मोहीम सुरू असून, अनेक ठिकाणचे विविध पक्षांतील कार्यकर्ते मोदी व फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास तयार होत आहेत.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था महायुतीच्या माध्यमातून लढविल्या जाणार असून, सांगलीचा महापौर महायुतीचाच असेल यात शंका घेण्याचे कारणच नाही. मात्र, मिरजेत झालेल्या कार्यक्रमात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगलीचा महापौर राष्ट्रवादीचाच असेल असे सांगितले आहे याकडे लक्ष वेधले असता, तो पक्षही महायुतीचाच एक घटक पक्ष आहे. यामुळेच महायुतीचाच असेल असे म्हटले असल्याचे सांगत यावर अधिक भाष्य करण्याचे टाळले.

अन्य पक्षांतील नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जात आहे. मात्र, माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत काय धोरण आहे असे विचारले असता आमदार चव्हाण यांनी सांगितले, की त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत लवकरच सकारात्मक पाहण्यास मिळेल. खासदार विशाल पाटील यांना पालकमंत्री पाटील हे वारंवार भाजप प्रवेशाचे खुले आवाहन करत असल्याबाबत विचारले असता ते म्हणाले, की भाजपची विचारधारा ज्या कोणा कार्यकर्त्यांला मान्य असेल, त्यांना पक्षात घेण्याचे धोरण असून, काही पत्रकारही भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे सांगितले.

दरम्यान, एका जाहीर कार्यक्रमात खासदार पाटीलसमर्थक माजी नगरसेवक मनोज सरगर आणि शुभांगी साळुंखे यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. संजयनगर येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष आमदार चव्हाण, पालकमंत्री पाटील यांच्यासह आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, आमदार गोपीचंद पडळकर, मकरंद देशपांडे, समित कदम, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग आदी प्रमुख नेते उपस्थित होते.

सध्या भाजपची संघटन मोहीम सुरू असून, अनेक ठिकाणचे विविध पक्षांतील कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास तयार होत आहेत. मोदी व फडणवीस यांच्या विकासाच्या धोरणावर विश्वास ठेवून जे कोणी भाजप प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त करतात, त्यांना पक्षात प्रवेश दिला जाईल असेही चव्हाण यांनी सांगितले.