सर्वोच्च न्यायालयाने दोन दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणीत विधानसभा अध्यक्षांना सुनावताना शिवसेनेतील दोन्ही गटांमधल्या आमदार अपात्रता प्रकरणावर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यावरून सेनेच्या दोन्ही गटांमध्ये मोठ्या प्रमाणावर आरोप-प्रत्यारोप चालू आहेत. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाच प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेली टीका चर्चेचा विषय ठरली आहे. एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना ‘मिलावटराम’ म्हणत त्यांना टोला लगावल्यानंतर आता खासदार संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना खोचक शब्दांत सल्ला दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

एकनाथ शिंदेंनी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. “बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला गाडा असं म्हटलं, त्या काँग्रेसला यांनी डोक्यावर घेतलं तेव्हाच यांनी हिंदुत्व सोडलं. हे सगळे २१ पक्ष एकत्र येऊन मोदींच्या विरोधात २०१४, १९ आणि आत्ताही एकत्र आले आहेत. जेवणात भेसळ करणाऱ्यांना मिलावटराम म्हणतात. तसे हे हिंदुत्वाचे मिलावटराम आहेत”, असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

दरम्यान, ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर दिलं आहे. “मुख्यमंत्र्यांना समाजवाद हा शब्द माहिती आहे का विचारा. समाजवादाची व्याख्या विचारा. ते स्वत:ला बाळासाहेबांचे खरे पाईक वगैरे म्हणवतात. त्यांना बाळासाहेब ठाकरे व समाजवादी नेत्यांचे संबंध कसे होते ते विचारा. जॉर्ज फर्नांडिस, मधू दंडवते, एस एम जोशी, नाना गोरे व बाळासाहेब ठाकरे एकमेकांवर टीका जरूर केली आहे. पण महाराष्ट्राच्या हितासाठी समाजवादी पक्षाचे अनेक नेते व बाळासाहेब ठाकरे एकत्र आले होते. संयुक्त महाराष्ट्राचा लढा, सीमाप्रश्नाचा लढा अशा अनेक प्रश्नांवर समाजवादी पक्ष व शिवसेना एकत्र आली”, असं संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले.

एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना धक्का; कल्याणमध्ये मनसेला मोठं खिंडार…

“मुख्यमंत्र्यांना विचारा बॅ. नाथ पै यांचं नाव ऐकलंय का? ज्या ठाण्यातून ते येतात, तिथे सर्वाधिक समाजवादी लोक काम करायचे. ज्या भाजपासोबत हे सत्तेत बसलेत त्या भाजपाला प्रथम सत्ता देण्याचं काम समाजवाद्यांनी केलं. त्यात जॉर्ज फर्नांडिस, जयप्रकाश नारायण आणि चंद्रशेखर यांचा समावेश होता. महाराष्ट्र तोडण्याची भाषा समाजवाद्यांनी केली नाही, संघ परिवाराने केली. त्यांच्याबरोबर तुम्ही बसले आहात”, असंही राऊत म्हणाले.

“शांतपणे बसा, ग्रंथालयात जा आणि..”

“आधी शांतपणे बसा. विधिमंडळाच्या ग्रंथालयात जा. जुन्या नोंदी तपासा. समाजवाद काय असतो हे समजून घ्या. आमच्याशी अनेकदा समाजवादी नेत्यांचे मतभेद झाले आहेत. तरीही त्यांचं महाराष्ट्रप्रेम व राष्ट्रभक्ती याबाबत कोणतीही शंका घेता येणार नाही. ज्या मुंबईवर मराठी माणसाचा पगडा पुसून टाकण्याचा प्रयत्न होतो, त्या मुंबई महापालिकेचा कारभार मराठीत व्हावा म्हणून पहिला प्रस्ताव जॉर्ज फर्नांडिस यांनी आणला होता. हा इतिहास आहे. तुम्ही कसली मिलावट म्हणताय?” असा सवालही राऊतांनी उपस्थित केला.

“…पण गिरीश महाजनांना नेहमी मोठी खाती मिळतात”, गुलाबराव पाटलांचं वक्तव्य चर्चेत…

“तुमची सडलेली भेळ पूर्ण झाली आहे. तुम्ही आम्हाला काय सांगताय हिंदुत्व, समाजवाद? पंडित नेहरूंनी देशात समाजवाद आणण्याचा प्रयत्न केला. म्हणून त्यांनी सार्वजनिक उपक्रमांच्या माध्यमातून लोकांना नोकऱ्या द्यायचा प्रयत्न केला. संघ परिवार, भाजपा ते आज विकून खात आहेत. तुम्हीही त्यात भागीदार आहात. एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राचा राजकीय इतिहास समजून घेतला पाहिजे आणि मग बोललं पाहिजे”, असा सल्लाही राऊतांनी दिला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut slams cm eknath shinde targeting uddhav thackeray pmw