सातारा: उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी महायुती सरकारमधील भ्रष्टाचारी मंत्री, तसेच त्यांचे वेगवेगळे राजकीय कारनामे यांचा साताऱ्यात जन आक्रोश मोर्चा काढून निषेध केला. या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रताप जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे महिला आघाडीच्या संघटिका छाया शिंदे यांनी केले. या भ्रष्टाचारी मंत्र्यांना तत्काळ घरी घालवण्यात यावे, पुरोगामी महाराष्ट्राला या मंत्र्यांनी बदनाम केल्याची घणाघाती टीका या वेळी शिवसैनिकांनी कडवट भावना व्यक्त करून केली.

या आंदोलनामध्ये सातारा तालुका संघटक प्रणव सावंत, सातारा तालुकाप्रमुख रमेश बोराटे, उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय नलावडे, खटाव तालुकाप्रमुख संजय नांगरे, शहर प्रमुख गणेश अहिवळे, युवा सेना शहर प्रमुख शिवेंद्र ताटे, ज्ञानेश्वर नलावडे, सुनील पवार, आकाश धोंडे, चंद्रकांत पोळ, संजय जाधव, संजय नलावडे इत्यादी शिवसैनिक सहभागी झाले होते या आंदोलनाला माजी जिल्हा शिवसेनाप्रमुख नरेंद्र पाटील यांनीसुद्धा मार्गदर्शन केले.

या आंदोलनाविषयी बोलताना प्रताप जाधव म्हणाले, की शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारमध्ये भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलनाचे आवाहन केले आहे. महाराष्ट्रामध्ये या मंत्र्यांच्या अकार्यक्षमतेमुळे जनतेमध्ये वेगळा संदेश गेला आहे. जनतेतला हा आक्रोश शिवसैनिक विविध निषेध आंदोलनाच्या माध्यमातून समोर आणत आहे . अशा भ्रष्टमंत्र्यांची तत्काळ राजीनामे घेऊन त्यांना घरी पाठवले जावे यासाठी हे निषेध आंदोलन असल्याचे प्रताप जाधव यांनी सांगितले.

या वेळी भ्रष्टाचारी मंत्र्यांचे मुखवटे सादर करून शिवसैनिकांनी साताऱ्यात रथातून प्रतीकात्मक रॅली काढली. शिवसैनिकांनी या रॅलीमध्ये पत्ते खेळून, तसेच काही मंत्र्यांची नक्कल करून तुम्ही लवकरच पालकमंत्री व्हा ‘ओम फट स्वाहा’ अशा विरोधी घोषणा देत, सातारकरांचे लक्ष वेधून घेतले.

शिवसैनिकांची ही फेरी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला बंधन करून थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर गेली. या वेळी शिवसेना शिष्टमंडळाने शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख व उपनेते शिवव्याख्याते नितीन बानुगडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनाचे निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले. अधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर शिवसैनिक व पोलीस यांच्यामध्ये कार्यालयात प्रवेश करण्यावरून जोरदार वादावादी झाली.