नांदेड : काँग्रेसचे केंद्रीय गृहमंत्री (दिवंगत) डॉ. शंकरराव चव्हाण यांनी भाजपाच्या पहिल्या फळीतील तत्कालीन नेत्यांशी राजकीय आणि वैचारिक पातळीवर आवश्यक ते अंतर राखण्याची खबरदारी नेहमीच घेतली; पण त्यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त स्थानिक समर्थकांनी शंकरराव आणि भाजपाच्या विद्यमान नेत्यांना डिजिटल फलकांच्या माध्यमातून एकत्र आणले आहे. तर शंकरराव आणि भाजपाच्या विद्यमान नेत्यांना गोदाकाठी ‘एका नावेचे प्रवासी’ केल्याचे दृश्य काँग्रेसजनांना बघावे लागत आहे.
मराठवाड्याच्या जलसंस्कृतीचे अध्वर्यू ही आपली ओळख निर्माण करणाऱ्या शंकररावांची सोमवारी १०६ वी जयंती असून त्यानिमित्त त्यांचे पुत्र व भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्या स्थानिक समर्थकांनी शहरभर, मोक्याच्या जागी लावलेल्या फलकांमध्ये भाजपच्या केंद्रीय तसेच राज्य पातळीवरील नेत्यांची छायाचित्रे प्रकाशित केल्याचे दिसत आहे.
शंकरराव चव्हाण यांच्या निधनास गतवर्षी (२०२४) २० वर्षे पूर्ण झाली. त्यांच्या पश्चात अशोक चव्हाण यांनी जिल्ह्यातील तसेच राज्यातील काँग्रेसचे नेतृत्व करताना भाजपच्या बाबतीत राजकीय व वैचारिक पातळीवर आपल्या पिताश्रींचीच भूमिका सातत्याने पुढे रेटली; पण याच वर्षात त्यांनी आपल्या परिवारासह भाजपमध्ये प्रवेश केला. गेल्या वर्षभरात वेगवेगळ्या प्रसंगांत आपल्या जुन्या पक्षावर त्यांनी टिकेचे बाण सोडले. आता त्यांच्या समर्थकांनी काँग्रेसचे दिवंगत नेते अशी ओळख असलेले शंकरराव आणि भाजपाच्या विद्यमान नेत्यांना गोदाकाठी ‘एका नावेचे प्रवासी’ केल्याचे दृश्य काँग्रेसजनांना बघावे लागत आहे.
शंकररावांच्या जयंतीनिमित्त दिल्या जाणाऱ्या ‘कुसुमताई चव्हाण स्मृती’ पुरस्कारांचे वितरण सोमवारी दुपारी येथे होणार असून या कार्यक्रमासाठी चव्हाण परिवाराने राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांना आमंत्रित केले आहे. बागडे हे जनसंघापासून त्या परिवारात राहिले असून भाजपाने त्यांना राज्यात मंत्री, विधानसभा अध्यक्ष या पदांवर संधी दिल्यानंतर आता त्यांची व्यवस्था जयपूरच्या राजभवनात केली आहे. शहरातील काही फलकांवर भाजपा नेत्यांसोबत राज्यपाल बागडे यांचेही छायाचित्र बघायला मिळाले.
भाजपाचे महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांनी शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर तसेच प्रमुख रस्त्यांलगतच्या भल्यामोठ्या फलकांद्वारे काँग्रेसच्या दिवंगत नेत्यास अभिवादन आणि राज्यपाल बागडे यांच्या स्वागताचा योग साधताना त्यावर भाजपच्या केंद्रीय व राज्यस्तरीय नेत्यांच्या छायाचित्रांची पेरणी केली आहे. अन्य काही उत्साही कार्यकर्त्यांनीही त्याचेच अनुकरण केल्याचे दिसून आले. या नियमबाह्य फलकबाजीकडे मनपा प्रशासनानेही डोळेझाक केल्याचे दिसत आहे.
शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण तसेच पक्षातील प्रमुख कार्यकर्त्यांनीही त्यांना अभिवादन करणारे फलक लावले आहेत. राज्यपाल बागडे यांचा कार्यक्रम ज्या वृत्तपत्रातर्फे आयोजित केला आहे, त्या वृत्तपत्राने मात्र फलकांतून शिष्टाचार पाळल्याचे दिसून आले. भाजपच्या केंद्रीय व राज्यस्तरीय नेत्यांची छायाचित्रे त्यातून वगळण्यात आली आहेत. या कार्यक्रमात नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक डॉ. सुरेश सावंत, डॉ. नितीन जोशी आदींचा सन्मान केला जाणार आहे.