महाराष्ट्रामध्ये पुढच्या काही महिन्यात विधानसभेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता पुन्हा एकदा सर्वच पक्षांसाठी ही निवडणूक महत्वाची असणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा निवडणुकीची रणधुमाळी लवकरच पाहायला मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच राजकीय पक्षांनी रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. तसेच विविध मतदारसंघात राजकीय नेत्यांचे दौरे वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याबरोबरच महायुती आणि महाविकास आघाडीमधील पक्षांचा जागावाटपाचा फॉर्म्युला लवकरच ठरणार असल्याची चर्चा आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार जाहीर करायला उशीर झाल्यामुळे महायुतीला फटका बसल्याचं महायुतीमधील अनेक नेत्यांनी सांगितलं. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लवकरच जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यात येणार असल्याचं सांगितलं जातं. अशातच काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ‘द ऑर्गनायझर’मधील लेखात अजित पवार गटाला बरोबर घेतल्याने भाजपाला फटका बसला असल्याची टीका करण्यात आली होती. तेव्हापासून महायुतीमध्ये धुसफूस सुरु असल्याची चर्चा आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटासंदर्भात मोठं विधान केलं आहे. “अजित पवार गटातील अर्ध्या लोकांचा महायुतीला विरोध आहे”, असा मोठा दावा अंबादास दानवे यांनी केला. ते टिव्ही ९ मराठीशी बोलत होते.

हेही वाचा : “NEET परीक्षा रद्द होण्यामागे केंद्र सरकारचा हलगर्जीपणा, आम्ही आता..,” सुप्रिया सुळेंचा इशारा

अंबादास दानवे काय म्हणाले?

“माझ्या माहितीनुसार, आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची बैठक झाली. त्यातील अर्ध्या लोकांचा महायुतीला विरोध केलेला आहे. त्यामुळे विधानसभेच्या जागा वाटपासंदर्भातील बातम्या या कल्पोकल्पित आहेत. अद्याप कोणत्याच पक्षाने जागा वाटप सुरु केलेलं नाही”, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं.

निवडणूक आयोगासंदर्भात दानवे काय म्हणाले?

उद्धव ठाकरे यांनी मतदानाच्या दिवशी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोग आणि भाजपावर काही आरोप केले होते. मतदान सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी संथगतीने मतदान सुरु असल्याचं म्हटलं होतं. भाजपाने त्यावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर भाजपाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने यांसदर्भातील अहवाल मागवला आहे. यासंदर्भात बोलताना अंबादास दानवे म्हणाले, “निवडणूक आयोगाने त्यावेळी हे केलं असतं तर बरं झालं असतं. तेव्हाच तत्काळ लक्ष द्यायला हवं होतं. मात्र, काही हरकत नाही. देर आए, दुरुस्त आए. आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत असं काही होऊ नये, यासाठीची खबरदारी निवडणूक आयोगाने घ्यावी”, असं ते म्हणाले.