सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, वेंगुर्ले, मालवण नगरपरिषद आणि कणकवली नगरपंचायत यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुकीत एकूण ४ नगराध्यक्ष आणि ७७ नगरसेवक पदांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.

​शनिवारपर्यंत या चारही ठिकाणी ​नगराध्यक्ष पदासाठी: ३ उमेदवारी अर्ज तर ​नगरसेवक पदासाठी: ६६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. ​कणकवली नगरपंचायत नगराध्यक्षपदासाठी भाजपचे समिर नलावडे यांनी आज अर्ज दाखल केला आहे.तर ​सावंतवाडी नगरपरिषद नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या सौ. श्रध्दाराजे भोसले आणि ठाकरे शिवसेनेच्या सौ. सिमा मठकर यांनी यापूर्वी अर्ज दाखल केले आहेत.​ वेंगुर्ले आणि मालवण नगरपरिषदमध्ये नगराध्यक्ष पदासाठी अद्याप अर्ज दाखल झालेले नाहीत.

​नगरसेवक पदासाठी विभागवार दाखल झालेले अर्ज; सावंतवाडी १६, मालवण २१, वेंगुर्ले १९ , कणकवली १० असे एकूण ६६ नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, उद्या रविवारी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू ठेवली आहे. तर सोमवार हे नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.

​महायुतीचे त्रांगडे कायम

​जिल्ह्यातील या निवडणुकांमध्ये महायुती (भाजप आणि शिवसेना – शिंदे गट) मध्ये जागावाटपावरून अद्यापही पेच कायम असल्याचे चित्र आहे. मालवण मध्ये भाजपने २० नगरसेवक पदांपैकी फक्त ४ जागा शिंदे शिवसेनेला देण्याची तयारी दर्शवल्याची चर्चा आहे. ​कणकवलीत शिंदे शिवसेनेला फारशी किंमत दिली जात नसल्याचे चित्र आहे. तर राजकीय वजन वापरून आमदार दीपक केसरकर यांच्यामुळे सावंतवाडी आणि वेंगुर्ले नगरपरिषदेत शिंदे शिवसेनेला काही जागा मिळण्याची शक्यता आहे.

​भाजपची भूमिका भाजप शत-प्रतिशत स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे घटक पक्ष असूनही गोंधळलेल्या अवस्थेत पहायला मिळतात. खासदार नारायण राणे यांनी महायुती व्हावी यासाठी चर्चा करण्याची ग्वाही दिली आहे.

​मात्र, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी दाखवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे महायुती फुटीच्या उंबरठ्यावर आहे असे बोलले जात आहे.

​शिंदे गटाची तयारी आणि माघारीचा पर्याय

​आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले की, शिवसेना (शिंदे गट) देखील अर्ज दाखल करणार आहे. मात्र, महायुती झाल्यास ठरलेल्या सूत्रानुसार उमेदवार नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. शिवसेना निवडणूक लढवणार आहे. महायुती कि स्वबळावर ते लवकरच कळेल असे त्यांनी सांगितले.

​सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीसाठी शिंदे गटाचे नामनिर्देशन पत्र आज (शनिवारी) दाखल होणार असल्याचे सांगितले होते, पण आता ते उद्या रविवारी दाखल करण्यात येणार आहेत. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस रविवार आणि सोमवार आहे. त्यामुळे या दोन दिवसांत ४ नगराध्यक्ष आणि ७७ नगरसेवक पदासाठी उमेदवारांची झुंबड उडणार आहे.