पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यात बुधवारी पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र, गेल्या चार दिवसांपासून पडत असलेला मुसळधार पाऊस आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे करमाळा, माढा, मोहोळ, उत्तर आणि दक्षिण सोलापूर येथील पूरस्थिती कायम आहे. या पुराचा फटका अनेक गावांना बसला असून, शेती, घरे, व्यवसाय, रस्ते, पूल यांचे या पुरामध्ये मोठे नुकसान झाले आहे. या पुरामुळे पुणे ते सोलापूर, सोलापूर ते विजापूर आणि सोलापूर ते कोल्हापूर या तीन महामार्गांवर पाणी आल्याने काही ठिकाणी वाहतूक बंद, तर काही ठिकाणी एकेरी सुरू होती. त्यामुळे महामार्गावर वाहनाच्या लांबवर रांगा लागल्या आहेत. सोलापूरकडे येणारी रेल्वेसेवाही या पावसामुळे विस्कळीत झाली आहे. त्याचा परिणाम जनजीवनावर दिसून आला.

दरम्यान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी बुधवारी जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करून मदतीचे आश्वासन दिले आहे. पूरग्रस्त भागात राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (एनडीआरएफ), लष्कराच्या मदतीने पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील जवळपास २२ हजार नागरिकांना स्थलांतरित केले, तर जवळपास अडीच लाख शेतकऱ्यांना या पुराचा फटका बसल्याची प्राथमिक माहिती आहे.

सोलापूर जिल्ह्यात सीना नदीचा पूर आणि काही तालुक्यांत झालेली अतिवृष्टी अशा दुहेरी संकटामुळे पुराच्या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. एरवी कायम दुष्काळी आणि पाण्याची समस्या जाणवणाऱ्या करमाळा, माढा, मोहोळ तालुक्यात यंदा पुराचे संकट ओढवले. सततची अतिवृष्टी आणि सीना नदीला आलेल्या पुराने या तालुक्यांमधील शेकडो गावांना पुराच्या पाण्याने विळखा घातला आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. हजारो एकरवरील पिके पाण्याखाली असून, अनेक घरांना, तसेच सार्वजनिक इमारतींनाही या पुराचा फटका बसला आहे.

दरम्यान, बुधवारी वरुणराजाने विश्रांती घेतली. तर, अनेक पूरग्रस्त गावांत सूर्यदर्शनही झाले. मात्र, सीना नदीत सोडण्यात आलेले पाणी सोलापुरात येत असल्याने पुराचा विळखा कायम राहिला. अनेक गावांत नदीचे पाणी आणि पुराचे पाणी ओळखणे कठीण झाले होते. घरांत पाणी शिरल्याने अनेकांचा संसार वाहून गेला. तर, घरातील टीव्ही, फ्रीज, गाड्या, फर्निचर पाण्याखाली गेलेले पाहण्याचे दु:ख ग्रामस्थांवर ओढवले. मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने शेतातील पिके पाण्याखाली वाहून गेल्याने शेतकरी पुरता कोलमडला आहे.

जिल्हा प्रशासनाने राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (एनडीआरएफ), लष्करच्या मदतीने पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील जवळपास २२ हजार रहिवाशांना स्थलांतरित केले, तर जवळपास अडीच लाख शेतकऱ्यांना या पुराचा फटका बसल्याची प्राथमिक माहिती आहे. या पुराचा फटका वाहतुकीवर दिसून आला. पुणे-सोलापूर महामार्ग, सोलापूर-विजापूर, सोलापूर-कोल्हापूर या मार्गांवरील वाहतूक काही ठिकाणी ठप्प झाली, तर काही ठिकाणी एकेरी सुरू होती. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पूर आणि वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे पुणे, मुंबईकडे जाणारा भाजीपाला, दुधाचा पुरवठा ठप्प होता. पूरग्रस्त भागातील शाळा, महाविद्यालयांना प्रशासनाने सुटी जाहीर केली आहे. सध्या पुराचे पाणी ओसरत आहे. मात्र, २७, २८ सप्टेंबर रोजी पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे. जर पाऊस पडला, तर पुन्हा पुराची भीती आहे. असे असले, तरी शेतकऱ्याच्या शेतात, घरात आणि आसवांत फक्त पाणीच उरले आहे, हे वास्तव आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी माढा तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून दोन हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यापुढेही पूरग्रस्तांना आवश्यक मदत देण्यासाठी शासन हात आखडता घेणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करमाळा, माढा, मोहोळ येथील बांधावर जाऊन पाहणी केली. गावातील चावडीवर बसून शेतकऱ्यांच्या व्यथा, समस्या जाणून घेतल्या. पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत दिली जाईल, असे आश्वासन पवार यांनी दिले. तर काही नियम शिथिल करून मदत दिली जाईल, असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.