चिपळूण : चिपळूण-कराड राष्ट्रीय महामार्गावरून सुस्साट धावणाऱ्या थार गाडीने समोरून येणार्या रिक्षाचा जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, त्या रिक्षेला ओढत नेल्याने मागून येणाऱ्या ट्रक व थार यांच्यामध्ये रिक्षा सापडून तिचा अक्षरश: चक्काचूर झाला. या अपघातात रिक्षा चालक, प्रवासी पती-पत्नी व त्यांचा चार वर्षांचा चिमुकला तसेच थार चालक अशा एकूण पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना पिंपळी येथील वाशिष्ठी डेअरी समोरील कॅनॉलवर सोमवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघात प्रकरणी थार चालकावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात, रिक्षा चालक इब्राहीम इस्माईल लोणे( वय ६२, पिंपळी नुराणी मोहल्ला), थार चालक आसिफ हाकीमुद्दीन सैफी ( वय २८, डेहराडून, उत्तराखंड) तर रिक्षातील प्रवासी नियाज महमंद हुसेन सय्यद (वय ५०), शबाना नियाज सय्यद (वय ४०) व हैदर नियाज सय्यद (वय ४, सर्व रा. पर्वती, पुणे) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर याबाबतची फिर्याद अमोल पांडुरंग कदम (रा. खेर्डी विकासवाडी, ता. चिपळूण) यांनी चिपळूण पोलिसात दिली.
नियाज सय्यद व शबाना सय्यद यांचा मुलगा पिंपळी येथील मदरसामध्ये शिक्षण घेत आहे. त्याला भेटण्यासाठी त्याचे आई-वडील व भाऊ हैदर असे तिघेजण आले होते. त्याची भेट झाल्यानंतर ते पुणे येथे परतीच्या प्रवासाला निघाला होते. सय्यद कुटुंब इब्राहीम लोणे यांच्या रिक्षामधून सोमवारी रात्री १० वा. च्या सुमारास पिंपळी ते रेल्वे स्टेशन असा प्रवास करत होते. त्यादरम्यान, चिपळूण ते कराड दिशेने आसिफ सैफी हा अति वेगाने थार गाडी चालवित समोरून घेऊन आला. त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि त्याने समोरून येणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक देत फरफटत नेले. रिक्षेच्या मागे ट्रक होता. त्यामुळे ती रिक्षा ट्रकवर आदळली आणि काही कळण्या अगोदरच भीषण अपघात झाला. रिक्षातील चालकासह तिन्ही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर थार चालकही या अपघातात मृत झाला. या अपघातानंतर त्या परिसरात रक्ताचा सडा पडला होता.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह राजकीय पुढारी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले, पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्यासह पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले. थार ही गाडी हरियाणा पासिंग आहे. दरम्यान, अपघातातील मृतदेह कामथे उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. या घटनेमुळे चिपळूण-कराड राष्ट्रीय महामार्गावरीची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिसांनी मंगळवारी सकाळी सय्यद कुटुंबातील पती-पत्नी व मुलगा तसेच इब्राहीम लोणे यांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले.
पिंपळी येथील अपघातापूर्वी काहीसा नाट्यमय प्रकार थार गाडीबाबत घडला. अपघातग्रस्त थार गाडीतील तरुण बहादूरशेखनाका येथे अभिरुची हॉटेल जवळ आला आणि तेथून पुन्हा गाडी बहादूरशेख नाक्याकडे जाण्यासाठी हॉटेल अभिरुची येथून वळली. त्याचवेळी एका तरुणीने ‘बचाव बचाव‘ असा आवाज देत त्या गाडीतून रस्त्यावर उडी मारली. हा प्रसंग घडूनही तो थार चालक तिथे थांबला नाही. गाडी घेऊन त्याने थेट कराडच्या दिशेने गाडीचा वेग वाढवला. याचवेळी या तरुणीने एका कार चालकाला थांबवून एकाने माझी थार गाडी चोरून नेली असून तुम्ही त्याचा पाठलाग करा, असे सांगितले. ती तरूणी अडचणीत असल्याचे लक्षात येताच त्या कार चालकाने तरुणीला गाडीत बसवून पाठलाग सुरू केला परंतु तो तरुण पिंपळीच्या दिशेने वेगाने निघून गेला.
त्यानंतर त्या कार चालकाने तरुणीला घेऊन पोलीस स्टेशनला घेऊन जात होता. मात्र ती तरुणी पोलीसांचे नाव घेताच घाबरल्याने त्या गाडीतूनही उडी मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कार चालकाने गाडी थांबवून तिला बहादूरशेख नाका येथे उतरवली. त्यानंतर काही वेळातच पिंपळी येथे थार गाडीचा अपघात घडल्याचे वृत्त सर्वत्र पसरले. दरम्यान, या अपघातानंतर संबंधित तरूणीला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. तिच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांना चिपळुणात बोलावण्यात आले आहे.