नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाप्रणित एनडीएने बहुमत मिळवलं असलं तरी विरोधकांच्या इंडिया आघाडीने जोरदार पुनरागमन केलं आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालसारख्या बलाढ्य राज्यांमध्ये एनडीएची पिछेहाट झाली आहे. या निवडणुकीत एनडीएने ‘४०० पार’चा नारा दिला होता. “अनेक राज्यांमध्ये या ‘४०० पार’च्या घोषणेचा एनडीएला मोठा फटका बसला, महाराष्ट्रातही महायुतीला म्हणावं तसं यश मिळालं नाही”, असं वक्तव्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष तथा पक्षाचे एकमेव खासदार सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सुनील तटकरे यांनी बारामतीमधील अजित पवार गटाचा पराभव, महाराष्ट्रातील महायुतीचं अपयश आणि राष्ट्रवादीच्या आगामी विधानसभा निवडणुकीतील योजनांवर भाष्य केलं. तटकरे म्हणाले, महाविकास आघाडी लोकसभा निवडणूक जिंकली असली तरी विधानसभा निवडणुकीत आम्ही त्यांचा पराभव करू. बारामतीत अजित पवार दीड लाख मतांनी जिंकणार आहेत. बारामतीची जनता सुज्ञ आहे. अजित पवारांनी गेल्या 30 वर्षात या मतदारसंघात खूप कामं केली आहेत, याची लोकांना जाणीव आहे. खरं तर लोकसभा निवडणुकीवेळी इंडिया आघाडी आघाडीने लोकांमध्ये अपप्रचार केला होता. देशात, राज्यात, राज्यातल्या वेगवेगळ्या भागात, मतदारसंघांमध्ये वेगवेगळा अपप्रचार केला होता. माझ्या मतदारसंघातही त्यांनी खोटा अपप्रचार केला होता प्रत्येक ठिकाणी त्यांनी हा केला त्यामुळे ते जिंकले. याबाबत आम्ही महायुती म्हणून विचारमंथन केलं आहे. यातून आम्ही काही निष्कर्ष काढले असून आता आम्ही विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. एनडीए म्हणून पूर्ण ताकदीने भाजपा, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) मिळून संपूर्ण ताकदीनिशी आम्ही निवडणुकीच्या तयारीला लागला आहोत

सुनील तटकरे एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते. यावेळी त्यांना विचारण्यात आलं की महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अजित पवार गट विधानसभेला किती जागांची मागणी करणार? यावर तटकरे म्हणाले, नुकतीच भाजपाच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मी आणि महायुतीतले काही वरिष्ठ नेते भाजपा पक्षश्रेष्ठींना भेटलो. आमच्यात दोन दिवस चर्चा झाली. लोकसभेचे निकाल, विदर्भात लागलेला वेगळा निकाल, मराठवाड्यातील आणि पश्चिम महाराष्ट्र, मुंबईसह कोकणातील परिस्थितीचा सारासार विचार केला. त्यानंतर राज्यात एनडीएला पुन्हा कसं मजबूत करता येईल यावर चर्चा केली. आता आम्ही महायुतीतले वरिष्ठ नेते महाराष्ट्रात एकत्र बसून चर्चा करणार आहोत. कदाचित विधानसभेच्या अधिवेशनापूर्वीच आम्ही एक बैठक करू या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जातील.

हे ही वाचा >> पराभवाचे खापर आमच्यावर नको; ‘ऑर्गनायझर’मधील लेखावर राष्ट्रवादीची भूमिका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतंच एक वक्तव्य केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की एनडीएने ४०० पारचा नारा दिला आणि ते तो नारा आमच्या अंगलट आला. यावर सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया विचारल्यावर ते म्हणाले, एकनाथ शिंदे हे वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्याकडे मोठा अनुभव आहे. त्यांच्या शिवसेनेने राज्यात लोकसभेच्या १५ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी सात जागांवर त्यांचे उमेदवार जिंकले आहेत. त्यांचा अनुभव पाहता कदाचित ते जे काही म्हणाले ते त्यांच्या दृष्टीने बरोबर असू शकतं आम्हालाही तसं वाटतं. ४०० पारचा नारा दिल्यानंतर विरोधकांनी संविधानाबाबत लोकांच्या मनात साशंकता निर्माण केली, त्यासाठी अप्रचार केला आणि त्यामध्ये ते यशस्वी झाले.