Supriya Sule On Azad Maidan Incident: राष्ट्रवादीच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला भेट देण्यासाठी काल मुंबईतील आझाद मैदानावर गेल्या होत्या. त्यावेळी काही आंदोलकांनी त्यांची गाडी रोखत गाडीवर पाण्याच्या बाटल्या फेकल्या होत्या. याचबरोबर शरद पवार यांच्याविरोधात घोषणाबाजीदेखील केली होती. यावर आता सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “त्यांचा एवढा तर हक्क आहेच ना. एवढ्या मोठ्या आंदोलनात तरुण मुले असतात, त्यांच्या मनात काही गोष्टी असतात. मी एक लोकप्रतिनिधी आहे, त्यामुळे सर्वांच्या भावनांचा मी आदर केलाच पाहिजे. जर एखाद्या मुलाच्या काही वेदना असतील तर त्या ऐकून घेणे, समजून घेणे आणि त्यातून मार्ग काढणे ही माझी जबाबदारी आहे. तिथे काहीही झाले नाही. एखाद्या मुलाने हट्ट केला तर त्यात काय गैर आहे.”
आझाद मैदानावर काय घडले?
मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी काल खासदार सुप्रिया सुळे आझाद मैदानावर गेल्या होत्या. त्यावेळी काही आंदोलकांनी त्यांची गाडी अडवत, गाडीवर पाण्याच्या बाटल्या फेकल्या. यासह शरद पवार यांच्याविरोधात घोषणाबाजीही केली. यावेळी आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांना घेराव घातल्याचेही पाहायला मिळाले.
यानंतर सुप्रिया सुळे जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी व्यासपीठावर गेल्या होता. पण ते विश्रांती घेत असल्याने सुप्रिया सुळे आणि जरांगे पाटील यांचे बोलणे होऊ शकले नाही.
या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांना सांगितले की, सुळे यांनी मराठा आंदोलकांना भेटून त्यांचे प्रश्न आणि अडचणी ऐकूण घेण्याचे धाडस दाखवले आहे.
जरांगे पाटलांनी व्यक्त केली नाराजी
दरम्यान काल संध्याकाळी मनोज जरांगे पाटील यांनी सुप्रिया सुळे यांची गाडी रोखणाऱ्या आणि त्यांच्या गाडीवर पाण्याच्या बाटल्या फेकणाऱ्यांना फटकारल्याचे पाहायला मिळाले. जरांगे-पाटील यांनी आंदोलक सुळेंसोबत ज्या पद्धतीने वागले त्याबद्दल नाराजी व्यक्त केली. “जर तुम्ही येथे येणाऱ्या नेत्यांना आदर दिला नाही तर कोणीही आपल्याकडे येणार नाही”, असे जरांगे पाटील म्हणाले.