भाजपाचा दिल्ली दरबार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अपमान करत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. भाजपाने देवेंद्र फडणवीस यांची दोन वेळा पदावनती केली आहे, दिल्लीत एका मराठी माणसाचा अपमान केला जात आहे, त्यामुळे मला वाईट वाटतं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी आक्रोश मोर्चाच्या तिसऱ्या दिवसाची आज (शुक्रवार, २९ डिसेंबर) सकाळी जुन्नर येथून सुरुवात झाली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. सुप्रिया सुळे यांच्याबरोबर खासदार अमोल कोल्हेदेखील उपस्थित होते. यावेळी सुप्रिया सुळे यांनी डोक्यावर भाजीपाल्याची टोपली घेऊन सरकारचा जाहीर निषेध नोंदवला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शेतकरी आक्रोश मोर्चावेळी सुप्रिया सुळे यांनी शेतकऱ्यांचे विविध प्रश्न मांडून केंद्र सरकारला धारेवर धरलं. तसेच त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलही भाष्य केलं. सुप्रिया सुळे म्हणाल्या, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस हे पाच वर्षे मुख्यमंत्री होते. दुर्दैवाने आता भाजपाचं सरकार असूनही ते मुख्यमंत्रीपदी कायम राहिले नाहीत. त्यांना फारसे अधिकारही दिले जात नाहीत. महाराष्ट्रातला एक कर्तृत्ववान नेता मोठा झाला, मुख्यमंत्री झाला, परंतु, तुम्ही (भाजपा) त्यांना आता उपमुख्यमंत्री केलं आहे. तुम्ही त्यांचा आणखी किती अपमान करणार आहात?

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस आधी मुख्यमंत्री होते. मग तुम्ही त्यांना उपमुख्यमंत्री केलंत. त्यानंतर आता अर्धे उपमुख्यमंत्री केलं आहे. हा फडणवीस यांच्यावरचा अन्याय नाही का? मी विरोधक म्हणून बोलत नाही. एखादा नेता कष्ट करत असेल, स्वतःच्या ताकदीवर १०५ आमदार निवडून आणत असेल तर त्याचा मानसन्मान करायला नको? परंतु, एका मराठी माणसाचा दिल्ली दरबारात अपमान केला जातोय. याचं मला खूप वाईट वाटतं.

हे ही वाचा >> “ठाकरे गट लोकसभेची एकही जागा स्वबळावर जिंकू शकत नाही”, काँग्रेसचा टोला; आघाडीत बिघाडीच्या चर्चा

शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार पाहत आहेत. त्यांच्याबरोबर केवळ ४० आमदार आहेत. तर तितकेच आमदार पक्षात असणारे अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. परंतु, भाजपाचे १०५ आमदार असूनही देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री म्हणून कारभार पाहत आहेत. यावरूनच सुप्रिया सुळे यांनी भाजपावर टीका केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sule says bjp high command insulting devendra fadnavis asc