Uddhav Thackeray On Vinod Tawde: विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीसाठी बुधवारी (२० नोव्हेंबर) राज्यात मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. पण असं असतानाच आज विरारमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या. विरारमधील एका हॉटेलमध्ये भाजपाचे नेते विनोद तावडे हे पैसे वाटत असल्याचा गंभीर आरोप बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर आणि आमदार क्षितीज ठाकूर यांनी केला. या आरोपानंतर बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्ते आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याचंही पाहायला मिळालं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जवळपास तीन ते चार तास हा संपूर्ण गोंधळ सुरु होता. मात्र, या गोंधळानंतर विनोद तावडे यांनीही हे सर्व आरोप फेटाळून लावले. दरम्यान, यावर विरोधकांनी भाजपावर टीकेची झोड उठवली आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत भाजपावर हल्लाबोल केला. भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा हा ‘नोट जिहाद’ आहे”, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.

हेही वाचा : विरारमध्ये ‘कॅशकांड’ तर डहाणूत हितेंद्र ठाकूरांना धक्का! मतदानाच्या काही तास आधी सुरेश पाडवी भाजपात

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

“पैसे वाटतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर हे कोणी पाहिलं पाहिजे? निवडणूक आयोगाने पाहिलं पाहिजे. काल अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाला. त्यानंतर आज पैसे वाटतानाचे काही व्हिडीओ समोर आले. त्यामुळे हे जादुचे पैसे कोठून आले? कोणाच्चा खिशात जात होते? आता देखील माझी बॅग तपासली गेली मग त्यांच्या बॅगांची तपासणी कोण करणार? निवडणूक आयोगाने यावर कठोर करावाई केली पाहिजे. अन्यथा निवडणूक आयोगावर कारवाई करण्यासाठी आम्हाला काहीतरी वेगळा मार्ग शोधावा लागेल. फक्त गुन्हा दाखल होऊन आरोपी फरार नाही झाले पाहिजेत. मला अशी माहिती मिळाली की काल नाशिकमध्येही पैसे वाटताना काहीजण फरार झाले. पण निवडणूक आयोगाने कारवाई केली पाहिजे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“विनोद तावडे जर का तावडीत सापडले असतील तर त्यांनी आतापर्यंत सरकारं कशी पाडली असतील आणि कशी बनवली असतील? याचा हा पुरावा आहे. महाराष्ट्राने हे पाहिले पाहिजे की आमच्या योजना आहेत त्या कशा फसव्या आहेत. एका बाजूला लाडक्या बहि‍णींना १५०० रुपये आणि यांना पैशांच्या थप्या चालल्या आहेत. हे जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. भाजपा, शिंदे आणि अजित पवारांचा हा ‘नोट जिहाद’ आहे का? म्हणजे भाजपाचा हा नोट जिहाद आहे, बाटेंगे और जितेंगे असं काही तरी. याचा छडा लागला पाहिजे”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackery attack on vinod tawade nala sopara cash for votes politics maharashtra assembly election 2024 gkt