Alia Bhatt and Ranbir Kapoor Bandra Bungalow: आलिया भट्ट व रणबीर कपूर हे सेलिब्रिटी जोडपे कायमच चर्चेत असते. कधी त्यांच्या चित्रपटांतील भूमिकांमुळे, तर कधी त्यांच्या खासगी आयुष्यामुळे हे कलाकार लक्ष वेधून घेत असतात.

आता अभिनेता रणबीर कपूर आलिया भट्ट हे त्यांच्या घरामुळे चर्चेत आले आहेत. वांद्रा येथील रणबीर व आलियाच्या या घराच्या बांधकामाचे काम काही वर्षांपासून सुरू होते. जेव्हा या घराचे बांधकाम सुरू होते तेव्हा आलिया-रणबीरचे बांधकाम पाहण्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले होते. आता या घराचे बांधकाम पूर्ण झाल्याचे समोर आलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

सहा मजल्यांचा हा बंगला आहे. या बंगल्याच्या प्रत्येक मजल्यावर झाडेदेखील पाहायला मिळाली आहेत. तसेच घराभोवती कुंपणदेखील बांधले आहे. मात्र गेटऐवजी एक पत्रा दिसत आहे. रणबीर-आलियाचे हे घर आता सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. सोशल मीडियावर या बंगल्याचा व्हिडीओ व्हायरल भयानी या चॅनेलने शेअर केला आहे. आलिया-रणबीरचा हा बंगला पाहिल्यानंतर अनेक चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

नेटकरी काय म्हणाले?

आता या सगळ्यात नेटकऱ्यांना मात्र गेट का बदलले नाही, असा प्रश्न पडला आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, “इतका खर्च झाला की नवीन गेट लावण्यासाठी पैसेच उरले नाहीत”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “गेट का बदलले नाही”, आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “गेटसाठी थोडे पैसे खर्च केले असते, तर बरं झालं असतं”, एका नेटकऱ्याने लिहिले, “पत्र्यांचं इतकं स्वस्त गेट का बनवलं?”, अशा अनेक कमेंट पाहायला मिळत आहेत.

समोर आलेल्या अनेक रिपोर्टनुसार, रणबीर व आलिया त्यांच्या नवीन घराची नोंदणी त्यांची लेक राहाच्या नावावर करणार आहेत. याबरोबरच या घराची किंमत २५० कोटी इतकी असून सेलिब्रिटींच्या घरांपैकी हे सर्वात महागडे घर असल्याचे म्हटले जात आहे. शाहरुख खानच्या मन्नत व अमिताभ बच्चन यांच्या जलसा या बंगल्यांपेक्षा आलिया-रणबीरच्या बंगल्याची किंमत जास्त आहे.

आलिया-रणबीरच्या कामाबाबत बोलायचे तर रणबीर कपूर लवकरच ‘रामायण’ या चित्रपटात दिसणार आहे. याआधी तो ‘अॅनिमल’ या चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. तसेच त्याच्या भूमिकेचीदेखील चांगलीच चर्चा झाली होती. याबरोबरच, संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’मध्ये रणबीर, आलिया व विकी कौशल प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. सध्या या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे.