Pahlaj Nihalani on Anil Kapoor and Madhuri Dixit: ‘आग का गोला’, ‘आँखे’, ‘आग ही आग’, ‘पाप की दुनिया’, ‘ज्युली २’, ‘रंगीला राजा’ अशा चित्रपटांची निर्मिती पहलाज निहलानी यांनी केली आहे.

आता चित्रपट निर्माते ‘सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’ (CBFC)चे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्याबद्दल वक्तव्य केले आहे. सध्या त्यांच्या वक्तव्यांची चर्चा होताना दिसत आहे.

“त्यांनी त्यांच्या कारकि‍र्दीत अनेक बी ग्रेडच्या चित्रपटात…”

पहलाज निहलानी यांनी नुकतीच टविकी लालवाणीटच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत अनिल कपूर यांनी ‘अंदाज’ चित्रपटावर केलेल्या वक्तव्यावर त्यांनी त्यांचे मत व्यक्त केले. पहलाज निहलानी म्हणाले, “अनिल कपूर यांनी एका मुलाखतीत ‘अंदाज’ चित्रपटाला बी ग्रेड चित्रपट म्हटले होते. मी त्यांची ती मुलाखती पाहिली आहे. पण, त्याच चित्रपटात त्यांना काम करायचे होते. करिश्माने त्या चित्रपटात तिला काम मिळावे, यासाठी मला विनवणी केली होती. लोक माझ्याबरोबर काम करण्यासाठी खूप उत्साही असत. अनिल कपूर हे त्यापैकी एक आहेत. त्यांनी त्यांच्या कारकि‍र्दीत अनेक बी ग्रेडच्या चित्रपटात काम केले आहे. फक्त पैशांसाठी त्यांनी ‘अंदाज’ चित्रपटात काम केले आहे, असे ते कसे म्हणू शकतात?”

शूटिंगदरम्यान चित्रपटात काही बदल सुचवले होते, गाण्यातील ओळी आणि डान्स स्टेप्सबद्दल काही बदल करण्याबाबत सल्ला दिला होता, ते पहलाज यांनी नाकारले, असे वक्तव्य अनिल कपूर यांनी केले होते. यावर पहलाज म्हणाले, “ते एक नंबरचे खोटारडे आहेत. हे कधीच घडले नाही. त्यांनी ‘खडा है खडा है’ हे गाणे शूटिंगआधी कमीत कमीत ५० वेळा ऐकले असेल.

“अनिल कपूर मला म्हणत असत की या गाण्यामुळे आपला चित्रपट हिट होईल. पण, जुही चावलाला या गाण्यातील स्टेप्सबद्दल खात्री वाटत नव्हती, पण मी तिला समजावले. अनिल कपूर यांना ‘अंदाज’मधील या गाण्याबद्दल खात्री होती. अनिल कपूर खोटारडे असून माझी बदनामी करत आहेत. मी माझ्या आयुष्यात कधीच बी ग्रेड चित्रपट बनवले नाहीत.”

पुढे पहलाज निहालानी यांनी कपूर कुटुंबावर काही आरोप केले. पहलाज निहालनी म्हणाले, “मी माधुरी दीक्षितला शोधले होते. ती माझ्या चित्रपटात काम करणार होती, पण लोकांनी समस्या निर्माण केल्या. बोनी कपूर, अनिल कपूर, सुभाष घई यांनी अफवा पसरवल्या की गोविंदा एका नवख्या अभिनेत्रीबरोबर काम करण्यास तयार नाही. मी तिच्याबरोबर करार केला होता. मी तिच्या सेक्रेटरीला शोधले होते. मी तिला भूमिका दिली, पण ऐनवेळी माधुरीने ती नाकारली. त्यांनी खोटे बोलून तिला त्यांच्या जाळ्यात अडकवले. बिचाऱ्या माधुरीने तिला जे सांगितले त्यावर तिने विश्वास ठेवला, पण बोनी कपूर व त्यांच्या गँगने तिला त्यांच्या बोलण्यात फसवले. त्यानंतर मी नीलमला चित्रपटात घेतले.

दरम्यान, ‘अंदाज’ चित्रपटाबद्दल बोलायचे तर डेव्हिड धवन दिग्दर्शित या चित्रपटात अनिल कपूर, जुही चावला, करीश्मा कपूर हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसले होते. १९९४ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.