Salim Khan And Salma Khan 61st anniversary: सलीम खान यांनी नुकताच सलमा खान यांच्याबरोबरचा ६१ वा लग्नाचा वाढदिवस साजरा केला. सलीम खान यांनी जावेद अख्तर यांच्याबरोबर अनेक चित्रपटांच्या कथा लिहिल्या. त्यांच्या लेखणीतून बॉलीवूडला अँग्री यंग मॅन ही संकल्पना मिळाली आणि त्यांच्या चित्रपटातून अमिताभ बच्चन यांना अँग्री यंग मॅन ही ओळख मिळाली.
सलीम खान जितके त्यांच्या करिअरमुळे प्रेक्षकांच्या लक्षात राहिले, तितकेच त्यांच्या खासगी आयुष्यामुळेदेखील त्यांची चर्चा झाली. सलीम खान यांनी सलमा खान यांच्याबरोबर १८ नोव्हेंबर १९६४ ला लग्नगाठ बांधली. त्यांना पाच मुले आहेत. सलीम खान यांनी हेलन यांच्याबरोबर दुसरे लग्न केले. हेलनदेखील खान कुटुंबाचा महत्त्वाचा भाग आहेत. अनेक कार्यक्रम आणि उत्सवांमध्ये हे संपूर्ण कुटुंब एकत्र दिसते.
आता नुकताच सलमा खान आणि सलीम खान यांनी त्यांच्या लग्नाचा ६१ वा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने संपू्र्ण कुटुंब एकत्र दिसले. यावेळी हेलन यांनी देखील हजेरी लावली होती. या कुटुंबातील सदस्यांनी याआधी दिलेल्या मुलाखतींमध्ये हेलन यांच्याबरोबर उत्तम बॉण्डिंग असल्याचे वक्तव्य केले होते. सलमान खानने एका मुलाखतीत हेलन आणि सलमा या उत्तम आई असल्याचे म्हटले होते.
आता या सेलिब्रेशनमध्ये सलमा खान, सलीम खान, हेलन, सलमान खान, अपूर्व लाखिया यांच्यासह इतर कुटुंबीय दिसले. तसेच सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालदेखील या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झालेले दिसले.
१९८० दरम्यान, सलीम-जावेद ही लोकप्रिय लेखकांची जोडी तुटली. ते वेगळे झाले. या दरम्यानच सलीम खान यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात एक मोठा निर्णय घेतला होता. त्यांनी हेलन यांच्याबरोबर लग्न केले. पण, त्यांनी सलमा खान यांच्याबरोबरचे लग्न मोडले नाही.
बॉलीवूड बबल या शोमध्ये अरबाज खानला दिलेल्या मुलाखतीत हेलन यांच्याबरोबरच्या लग्नाबाबत वक्तव्य केले होते. ते म्हणालेले, “ती तरुण होती, मीही तरुण होतो. आमचा लग्न करण्याचा कोणताही मानस नव्हता, पण भावनेतून ते सर्व काही झाले. हे कोणाबरोबरही होऊ शकते. जेव्हा मी सलमाला याबद्दल सांगितले, तेव्हा आमच्यात काही समस्या निर्माण झाल्या होत्या. पण, ते सर्व खूप कमी काळासाठी होते. त्यानंतर सर्वांनी माझे दुसरे लग्न स्वीकारले. मी माझ्या मुलांनादेखील माझ्या दुसऱ्या लग्नाबद्दल सांगितले. त्यांना मी सांगितले की मी तुमच्याकडून काहीही अपेक्षा ठेवत नाही, पण तुम्ही तिला आदर द्यावा इतकेच वाटते.”
दरम्यान, आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओवर अनेक नेटकरी शुभेच्छांचा वर्षाव करत असल्याचे पाहायला मिळते.