Why Hema Malini refusal to marry Sanjeev Kumar: बॉलीवूड अभिनेत्री अरुणा इराणी यांनी अनेक दिग्गज कलाकारांबरोबर काम केले आहे. त्यांनी प्रसिद्ध अभिनेते संजीव कुमार यांच्याबरोबर अनेक चित्रपटांत स्क्रीन शेअर केली आहे.
आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी संजीव कुमार यांच्याबद्दल वक्तव्य केले. संजीव कुमार यांनी हेमा मालिनी यांना प्रपोज करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो अयशस्वी ठरला, असा खुलासाही अरुणा इराणी यांनी केला.
“मी त्यांच्यासारखा व्यक्ती…”
‘लेहेरेन रेट्रो’ला दिलेल्या मुलाखतीत अरुणा इराणी म्हणाल्या, “मी त्यांच्यासारखा व्यक्ती कधीच पाहिला नाही. ते कसल्याही अवतारात दिसत असत. आम्ही त्यावेळी तरुण होतो, त्यामुळे व्यवस्थित तयार होऊन आम्ही बाहेर फिरण्यासाठी जायचो, पण संजीव कुमार कधीच तयार होऊन आले नाहीत.”
पुढे त्या म्हणाल्या, “मी असेही ऐकले होते, संजीव कुमार यांना हेमा मालिनी यांच्याशी लग्न करायचे होते. मात्र, संजीव कुमार जेव्हा त्यांना प्रपोज करण्यासाठी गेले, तेव्हा त्यांनी स्वत:वर थोडीदेखील मेहनत घेतली नाही. ते नेहमीप्रमाणेच कुर्ता, पायजमा आणि चप्पल अशा अवतारात हेमा मालिनी यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यांना तशा अवतारात पाहून हेमा मालिनी यांनी संजीव कुमार यांना नकार दिला. हेमाजींना त्यांच्याबरोबरचे नाते पुढे न्यायचे होते. त्या धाडस करत होत्या, पण संजीव कुमार यांना तशा अवतारात पाहिल्यानंतर गोष्टी बिघडल्या. संजीव कुमार अजिबात कपड्यांची स्टाइल करायचे नाहीत, ते खूप साधे राहायचे.”
संजीव कुमार यांच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचे तर ते आयुष्यभर अविवाहित होते. १९८५ साली वयाच्या ४७ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. हेमा मालिनी व त्यांच्या नात्याची मोठी चर्चा झाली. ‘सीता और गीता’ (१९७२) च्या सेटवर त्यांच्या प्रेमकहाणीची सुरुवात झाली. हनीफ झवेरी आणि सुमंत बत्रा यांच्या ‘अॅन अॅक्टर्स अॅक्टर’ या पुस्तकानुसार ‘हवा के साथ साथ’ या गाण्याच्या शूटिंगदरम्यान ते एकमेकांच्या अधिक जवळ आले.
या पुस्तकात असेही लिहिले आहे की, संजीव कुमार हेमा मालिनी यांच्याशी लग्न करण्याबाबत गंभीर होते. मात्र, संजीव कुमार व हेमा मालिनी या दोघांच्या कुटुंबीयांकडून त्यांच्या नात्याला विरोध होता. संजीव कुमार यांच्या आई शांताबेन यांचा या लग्नाला विरोध होता. मात्र, हेमा मालिनी यांनी त्यांच्या प्रेमळ स्वभावाने त्यांचे मन जिंकले. पण, लग्नानंतरही हेमा मालिनी यांनी त्यांची कारकीर्द सुरू ठेवावी, असे अभिनेत्रीच्या आईला जया चक्रवर्तींना वाटत होते. संजीव कपूर यांच्या कुटुंबीयांना ही अट मान्य नव्हती.
दरम्यान, १९८० मध्ये हेमा मालिनी यांनी अभिनेता धर्मेंद्र यांच्याबरोबर लग्नगाठ बांधली. त्यांना ईशा व अहाना या दोन मुली आहेत.