Actors On early struggles in the film industry: ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ हा गाजलेल्या कार्यक्रमांपैकी एक आहे. सध्या या शोचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत असलेल्या या शोमध्ये नुकतीच जयदीप अहलावत, प्रतीक गांधी व जितेंद्र कुमार यांनी हजेरी लावली होती.
“त्याबद्दल कोणतेही दु:ख नाही..”
या कलाकारांनी एकमेकांशी गप्पा मारताना त्यांच्या संघर्षाच्या काळाची आठवण सांगितली. जयदीप अहलावतने सांगितले की, सुरुवातीच्या काळात तो एका छोट्या अपार्टमेंटमध्ये राहायचा. अभिनेता म्हणाला, “आमचा एक बीएचकेचा फ्लॅट होता. आधी आम्ही दोघे होते. त्यानंतर हळूहळू लोक वाढले. आम्ही सहा जण त्या छोट्या अपार्टमेंटमध्ये राहायचो, कारण कोणीतरी राहण्यासाठी विचारायचे. त्या घराची जी बेडरुम होती, त्यामध्ये आम्ही कपडे ठेवायचो आणि सगळेजण हॉल आणि किचनमध्ये झोपायचो. पण, आम्ही मजा केली. त्याबद्दल कोणतेही दु:ख नाही किंवा वाईट वाटत नाही.
प्रतीक गांधी त्याच्या संघर्षाचे दिवस आठवत म्हणाला, “मी अजय देवगणच्या ‘दिल तो बच्चा है जी’ या चित्रपटात एक छोटीशी भूमिका साकारली होती. त्या भूमिकेसाठी माझी ऑडिशनही झाली होती. मात्र, जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझी भूमिका चित्रपटातून काढली आहे. चांगली गोष्ट ही की, मी त्या चित्रपटाचा भाग आहे हे मी कोणालाच सांगितले नव्हते.
आयआयटी ग्रॅज्युएट असलेल्या जितेंद्र कुमारने सांगितले की, मुंबईत आल्यानंतर पहिल्या तीन महिन्यातच मी अभिनय आणि मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये (एनएसडी) अर्जही केला, पण तो फेटाळण्यात आला. मुंबईला आल्यानंतर तीन महिन्यांनी जेव्हा मी ट्रेनमधून परत जात होतो, तेव्हा मी स्वतःला सांगितलं होतं की मी परत येईन. सुदैवाने जेव्हा मी परत आलो, तेव्हा लोकांना माझं काम आवडलं.”
जयदीप अहलावतने काही दिवसांपूर्वीच महिन्याभरात मुंबईत दोन फ्लॅट खरेदी केले होते, त्यामुळे त्याची मोठी चर्चा झाली होती. अभिनेत्याच्या कामाबद्दल बोलायचे तर नुकताच तो ‘ज्वेल थीफ’मध्ये दिसला होता. लवकरच तो ‘पाताल लोक सीझन २’ आणि ‘इक्किस या चित्रपटांत दिसणार आहे.