Chandu Champion Box Office Collection Day 2: सध्या कार्तिक आर्यनच्या ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटाचं आणि त्याच्या कामाचं कौतुक केलं जातं आहे. यासंबंधित अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण असं असलं तरी दुसऱ्या बाजूला बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची कमाई धिम्या गतीने सुरू आहे. गेल्या वर्षभरात कार्तिक आर्यनच्या आलेल्या चित्रपटांपेक्षा ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटाची पहिल्या दिवशीची कमाई सर्वात कमी आहे. ‘शहजादा’ आणि ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटांनी पहिल्या दिवशी ६ कोटींची कमाई केली होती. पण ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपट ५ कोटींचा आकडा ओलांडू शकला नाही.

कबीर खान दिग्दर्शित ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपट १४ जूनला प्रदर्शित झाला. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, कार्तिक आर्यनच्या या बहुचर्चित व बहुप्रतीक्षित चित्रपटाने पहिल्या दिवशी फक्त ४.७५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कमाईत चांगली वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ६.७५ कोटी कमावले. त्यामुळे दोन दिवसांत या चित्रपटाने १० कोटींचा आकडा पार केला.

हेही वाचा – Video: ‘पुष्पा २’ चित्रपटातील ‘सूसेकी’ गाण्यावर हृषिकेश-जानकीचा मराठमोळा ठसका, नेटकरी म्हणाले, “एकच नंबर…”

कार्तिकच्या ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटाने दोन दिवसांत एकूण ११.५० कोटींची कमाई केली आहे. भारतात जरी संथ गतीने या चित्रपटाची कमाई सुरू असली तरी जगभरात प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. जगभरातील कलेक्शनविषयी बोलायचं झालं तर, पहिल्याच दिवशी कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने ७.६० कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या दिवसाचे कलेक्शन अजून समोर आलेलं नाही. पण पहिल्या दिवसांचे आकडे पाहता भारतापेक्षा इतर देशात ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटाचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

हेही वाचा – ऐश्वर्या-अविनाश नारकरांच्या मुलाच्या गर्लफ्रेंडला पाहिलंत का? ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेत झळकणार

‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटाची कथा मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनावर आधारित आहे. सुवर्णपदक विजेते पेटकर यांनी १९७० साली कॉमनवेल्थ गेम्समध्ये आणि त्यानंतर १९७२ साली जर्मनीमध्ये झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये देशाचं नाव उज्वल केलं होतं. या चित्रपटात कार्तिक व्यतिरिक्त विजय राज, भाग्यक्षी आणि राजपाल यादव महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत.

हेही वाचा – Video: ‘तुझेच मी गीत गात आहे’च्या चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवशी स्वरा आणि मल्हारने केला खास आमरस, पाहा व्हिडीओ

दरम्यान, कार्तिक आर्यनच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘चंदू चॅम्पियन’ व्यतिरिक्त त्याच्या ‘भूल भुलैया ३’ चित्रपटाची देखील चाहते वाटत पाहत आहेत. या चित्रपटात कार्तिकबरोबर अभिनेत्री विद्या बालन, तृप्ती डिमरी झळकणार आहे.