बॉलीवूडमधील कलाकारांच्या अफेअरच्या अफवा किंवा चर्चा या काही नवीन नाहीत. बॉलीवूडमधील अनेक कलाकारांच्या नात्याविषयी सोशल मीडियामध्ये चर्चा होताना दिसतात. असेच चर्चेत येणारे कलाकार म्हणजे अभिनेता अमोल पराशर आणि अभिनेत्री कोंकणा सेन. २०१९ मध्ये त्यांनी नेटफ्लिक्सवरील ‘डॉली किट्टी’ आणि ‘वो चमकते सितारे’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. त्यानंतर १४ मे रोजी मुंबईत अमोलच्या ‘ग्राम चिकित्सकालय’ या वेबसीरिजच्या स्क्रीनिंगला कोंकणाने हजेरी लावली होती.
कोंकणाला पाहून अमोल आनंदी झाला होता. यावेळी कोंकणा सेन आणि अमोल पराशर यांनी एकत्र पोज दिल्या होत्या. वेबसीरिजच्या स्क्रीनिंगच्या निमित्ताने पहिल्यांदाच हे दोघे सार्वजनिकरित्या एकत्र दिसले होते. त्यामुळे त्यांच्याबद्दलच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या होत्या. अमोल किंवा कोंकणापैकी कोणीच अद्याप त्यांच्या नात्याबद्दल सांगितलं नाही. अशातच अमोलने आता पहिल्यांदाच दोघांच्या नात्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
‘हिंदुस्तान टाईम्स’बरोबरच्या संवादामध्ये कोंकणाबरोबरच्या नात्याबद्दल अमोलने सांगितले की, “मला आजवर कोणीही काहीही विचारलं नाही, त्याऐवजी प्रत्येकाने स्वतःचे मत मांडायला सुरुवात केली. पूर्वी मी प्रत्येक बातमीवर प्रतिक्रिया द्यायचो. पण आता मी ते करत नाही. मला जर काही शेअर करायचं असेल, तर मी स्वतः ते सोशल मीडियाद्वारे शेअर करेन.”
यापुढे अमोल म्हणाला, “तुमच्या आयुष्यात काही लोक असतात. काही लोक तुमच्यासाठी खास असतात आणि काही लोक तुमच्यासाठी खूपच खास असतात. प्रत्येक नात्याला नाव देणं आवश्यक नाही. तुम्ही आनंदी असता, दुसरी व्यक्ती आनंदी असते आणि कुटुंबही आनंदी असतं. माझ्यासाठी एवढं बस्स आहे.” यापुढे अमोलने विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या डेटिंगचाही उल्लेख केला. ‘सरदार उधम’च्या शूटिंगदरम्यान अमोलला विकी-कतरीनाच्या डेटिंगबद्दल विचारलं जायचं.
याबद्दल अमोल म्हणाला, “लोक मला अनेकदा विकी-कतरीनाच्या नात्याबद्दल विचारायचे. ज्यामुळे मी विकीला त्यांचं नातं स्वीकारण्यास सांगितलं होतं. पण विकीने मला तेव्हा “मी योग्य वेळी उत्तर देईन” असं म्हटलं होतं.” यानंतर अमोलने कोंकणाबरोबरच्या नात्याच्या अफवांबद्दल म्हटलं, “मला स्वतःला आश्चर्यचकित करायला आवडतं आणि माझ्या कुटुंबाला ते माहित आहे. जर मी लग्न केले; तर मी ते इन्स्टाग्रामवर पोस्ट करेन. कारण ते सर्वांसाठी महत्त्वाचे आहे. पण सध्या माझ्याकडे बोलण्यासारखे काही नाही.”