बॉलीवूडचे कलाकार हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी त्यांच्या चित्रपटामुळे, कधी त्यांनी शेअर केलेल्या पोस्टमुळे, तर कधी त्यांनी मुलाखतीदरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे हे कलाकार चर्चांचा भाग बनतात. आता लोकप्रिय अभिनेत्री क्रिती सेनॉन ही आदिपुरुष चित्रपटाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाली अभिनेत्री?

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत क्रिती सेनॉनने आदिपुरुष चित्रपटाबद्दल वक्तव्य केले आहे. या चित्रपटाच्या अपयशानंतर तिची प्रतिक्रिया काय होती, याबरोबरच या चित्रपटात सीतेचे पात्र साकारल्यानंतर तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. या सगळ्याला ती कशी सामोरी गेली, या प्रश्नांना तिने उत्तरे दिली. ती सांगते, “आदिपुरुष चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरणे खूपच निराशाजनक होते. अशा प्रकारच्या अपयशाला सामोरे जाताना कोणालाही वाईट वाटून डोळ्यात अश्रू येणे सहाजिक आहे. कुठे चुकले हे वाटणे सहाजिक आहे”, असे क्रितीने म्हटले आहे.

पुढे सांगताना ती म्हणते, “कोणाच्याही भावना दुखावण्याचा कधीही हेतू नव्हता. प्रत्येक प्रोजेक्टमागचा हेतू हा सकारात्मकच असतो. पण, आपल्याला वास्तवाला सामोरे जावे लागते, काही वेळा गोष्टी समजत नाही. मात्र, अशा अनुभवांमधूनच शिकणे महत्त्वाचे आहे.”

अभिनेत्री म्हणते, “काही गोष्टी माझ्या हातात नसतात. अभिनेत्री म्हणून लक्ष केंद्रित करणे, मेहनत आणि प्रयत्न करत राहणे आणि पुढच्या प्रोजेक्टकडे लक्ष देणे हा उत्तम दृष्टिकोन आहे. अनेक गोष्टी माझ्या नियंत्रणाबाहेर आहेत. परंतु, मी माझ्या भूमिकेला न्याय देण्यासाठी माझ्या संपूर्ण क्षमतांचा वापर करते, त्यासाठी प्रयत्न करते.

हेही वाचा: “आजोबा, प्रत्येक क्षणाला तुमची…”, विलासराव देशमुखांच्या आठवणीत रितेश-जिनिलीया भावुक, शेअर केले जुने फोटो

तिने केलेल्या अभिनयावर किंवा भूमिकेवर होणाऱ्या टीकेसंबंधी ती म्हणते, मला चित्रपट बघितल्यानंतर ज्या खऱ्या टीका असतात, ज्यामधून काय चूक झाली आहे ते समजते, त्या मी स्वीकारते. खरे अभिप्राय आणि इतर कोणत्या गोष्टींच्या टीका करताना काढलेला राग यामध्ये फरक असतो. माझा चित्रपट पाहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या घरी चहा सेशन असतो. त्यावेळी माझे कुटुंबीय त्यांना काय आवडले आणि काय नाही याबद्दल स्पष्टपणे मला सांगतात. असे जे खरे अभिप्राय असतात, त्यांचा फायदा होतो असा माझा विश्वास आहे. पण, सगळ्या प्रकारच्या टीकांचा तुम्ही तुमच्यावर परिणाम होऊ न देणे हे महत्त्वाचे आहे, असे क्रिती सेनॉनने म्हटले आहे. ‘आदिपुरुष’ चित्रपट हा ‘रामायणा’वर आधारित होता. या चित्रपटात प्रभासने रामाची, तर क्रितीने सीतेची भूमिका साकारली होती.

दरम्यान, अभिनेत्रीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘क्रू’ आणि ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ हे दोन्ही चित्रपट यशस्वी ठरले आहे. प्रेक्षकांकडून या चित्रपटांना उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले आहे. दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर ८० कोटी रुपयांची कमाई केल्याचे पाहायला मिळाले.

आता क्रिती ‘दो पत्ती’ हा चित्रपट प्रदर्शित होण्याची प्रतीक्षा करत आहे. निर्माती म्हणून तिचा हा पहिलाच चित्रपट असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या चित्रपटात लोकप्रिय अभिनेत्री काजोल देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kriti senon open ups on 600 crore buget film adipurush failure nsp