बॉलीवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित आणि अभिनेते अनिल कपूर यांची जोडी १९८८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तेजाब’ सिनेमामुळे घराघरांत लोकप्रिय झाली. जवळपास ३७ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘तेजाब’ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटातील सगळी गाणी सुपरहिट ठरली होती.
मात्र, तुम्हाला माहितीये का बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरलेल्या या सिनेमासाठी माधुरी दीक्षित पहिली पसंती नव्हती. याशिवाय अनिल कपूर यांच्याऐवजी सुद्धा वेगळ्याच अभिनेत्याला हा सिनेमा ऑफर करण्यात आला होता. याबद्दल जाणून घेऊयात…
माधुरी दीक्षितने साकारलेल्या ‘मोहिनी’ची भूमिका आधी मीनाक्षी शेषाद्रीला ऑफर करण्यात आली होती. पण, यानंतर मीनाक्षी आणि निर्मात्यांमध्ये मानधनाच्या बाबतीत अंतिम करार होऊ शकला नाही. मीनाक्षी शेषाद्रीबरोबरच्या वाटाघाटी अयशस्वी झाल्यानंतर, निर्मात्यांनी माधुरी दीक्षितशी संपर्क साधला. त्यावेळी ‘धकधक गर्ल’ चित्रपटसृष्टीत एक नवीन चेहरा होती.
तर, अनिल कपूर यांच्या भूमिकेसाठी पहिली पसंती आदित्य पंचोलीला देण्यात आली होती. पण, मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यावेळी बोनी कपूर यांच्या हस्तक्षेपामुळे आदित्यच्या जागी अनिल कपूर यांची वर्णी लागली होती. अनिल कपूर सुरुवातीला माधुरीचा अभिनय आणि नृत्य कौशल्याबद्दल साशंक होते. पण, पुढे जाऊन त्याचा फारसा फरक पडला नाही. सिनेमा प्रदर्शित झाल्यावर माधुरी दीक्षित आणि अनिल कपूरची जोडी बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरली होती. याशिवाय ‘धकधक गर्ल’चं ‘एक दो तीन’ हे गाणंही सर्वत्र लोकप्रिय ठरलं.
खरंतर, १९८४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अबोध’ चित्रपटातून अभिनेत्री माधुरी दीक्षितने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र, मनोरंजनविश्वात एन्ट्री घेतल्यावर सुरुवातीला अभिनेत्रीला फारसं यश मिळालं नाही. ‘अबोध’नंतर, ‘आवारा बाप’, ‘स्वाती’, ‘हिफाजत’, ‘उत्तर दक्षिण’, ‘मोहरे’, ‘खतरो कें खिलाडी’, ‘मानव हत्या’, ‘दयावान’ असे तिचे १० चित्रपट फ्लॉप ठरले होते. त्यामुळे त्याकाळात माधुरीच्या बॉलीवूड करिअरवर टांगती तलवार आली होती. मात्र, १९८८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तेजाब’ चित्रपटाने तिला रातोरात सुपरस्टार केलं.
‘तेजाब’मुळे तिचं रातोरात नशीब उजळलं. या सिनेमानंतर तिने कधीही मागे वळून पाहिलं नाही. १९८८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तेजाब’ने बॉक्स ऑफिसवर १६ कोटी कमावले होते. हा १९८८ मध्ये सर्वाधिक कमाई करणारा बॉलीवूड सिनेमा ठरला होता.