Salman Khan Is A Criminal Says Abhinav Kashyap : सलमान खानने आजवर अनेक वेगवेगळ्या चित्रपटांत काम केलं आहे. त्यातलाच एक म्हणजे ‘दबंग’ हा सिनेमा. ‘दबंग’ चित्रपटाचं दिग्दर्शन अनुराग कश्यपचा भाऊ अभिनव कश्यपनं केलं होतं. अशातच आता त्यानं सलमानबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

‘दबंग’चा दिग्दर्शक अभिनव कश्यपनं पूर्वीसुद्धा सलमान खान व त्याच्या कुटुंबीयांबद्दल गंभीर आरोप केले होते. सलमान खान गुंडा आहे आणि त्याला अभिनयात रस नाही. तसेच, त्याच्या कुटुंबालाही सगळ्यांना ताब्यात ठेवायच असतं, असं त्यानं म्हटलेलं. अशातच आता अभिनवनं पुन्हा एकदा सलमान खानबद्दल वक्तव्य केलं आहे.

‘बॉलीवूड ठिकाना’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनव सलमानबद्दल म्हणाला, “‘वॉंटेंड’ आणि ‘तेरे नाम’ या चित्रपटांतील भूमिकांमुळे त्याचं व्यक्तिमत्त्व गुंडासारखं झालेलं”. त्यानं पुढे सांगितलं की, ‘दबंग’साठी त्यानं आधी सलमानचा भाऊ अरबाज खानला विचारलेलं; पण त्यानं नंतर या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळली.

सलमान व अभिनव यांच्यामध्ये मीटिंग झाल्यानंतर अभिनवला १० लाख रुपये देण्यात आल्याचं त्यानं सांगितलेलं. अभिनव त्याबद्दल पुढे म्हणाला, “चित्रपटासंबंधित निर्णयांमध्ये मी सहभागी नव्हतो. सर्व निर्णय झाले आहेत, असं मला सांगण्यात आलेलं. सोनाक्षीची चित्रपटासाठी मुख्य नायिकेसाठी निवड झाली आहे याबद्दलही मला माहिती नव्हती.”

सलमान खानबद्दल अभिनव कश्यपचं वक्तव्य

सलमान खानच्या कुटुंबाबद्दल अभिनव म्हणाला, “त्याच्या कुटुंबातील सदस्य गुन्हेगार आहेत. सलमानची जामिनावर सुटका झाली; पण तो गुन्हेगार आणि गुन्हेगार गुन्हेगारच असतो.” त्यासह त्यानं काही दिवसांपूर्वी ‘स्क्रीन’ला दिलेल्या मुलाखतीत सलमानला २५ वर्षांपासून अभिनयात रस राहिला नसून, तो काम करून स्वत:वरच उपकार करीत आहे. त्याला अभिनयापेक्षा सेलिब्रिटी असल्यामुळे येणाऱ्या पॉवरमध्ये जास्त रस असल्याचं म्हटलं होतं.

अभिनवप्रमाणे अनुराग कश्यपचंही ‘तेरे नाम’ चित्रपटामुळे सलमान खानबरोबर बिनसलं होतं. या चित्रपटासाठी अनुराग कश्यप लेखन करणार होता; परंतु, नंतर त्याला यातून काढण्यात आलं. त्याबद्दल त्यानं एका मुलाखतीत सांगितलेलं.

दरम्यान, अभिनव कश्यप दिग्दर्शित ‘दबंग’ चित्रपट २०१० साली प्रदर्शित झालेला. त्यामध्ये सलमान खान व सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकांत झळकलेले. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळालेला. नुकतच या चित्रपटाला प्रदर्शित होऊन, १५ वर्षं झाली आहेत. त्याचा ‘दबंग २’ हा दुसरा भागही काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता.